पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ज्वलंनशील केमिकलचा टँकर उलटला

सावता नवले
Sunday, 17 January 2021

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ (ता. दौंड ) कारचा अपघात झाल्याने ज्वलंनशील केमिकलचा टँकर उलटला.

कुरकुंभ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ (ता. दौंड ) कारचा अपघात झाल्याने ज्वलंनशील केमिकलचा टँकर उलटला. घटनास्थळी अग्निशामक, पोलिस यंत्रणा दाखल झाली. मात्र सुदैवाने आगीसारखी मोठी दुर्घटन टळल्याने औद्योगिक वसाहतीतील कंपन्या व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा अपघात रविवारी (ता. 17) दुपारी चारच्या सुमारास घडला.

 'कधी झाडाखाली तर कधी स्टूडिओमध्ये झोपून काढले दिवस'

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील सामाजिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राजवळ पुण्याकडून सोलापूरकडे जाणारा केमिकल टँकर (  एमएच. 04 , जेयु. 9591) व कार ( .टीएस. 10, ईबी. 5428 ) यांच्यात अपघात झाला. अपघातात मुंबईहून ज्वलनशील केमिकल घेऊन जाणारा टँकर उलटला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून एक जण जखमी झाला.  टँकर उलटल्याने त्यामधील केमिकल रोडवर सांडल्याने उग्रवास सुटला होता. अपघाताने काही वेळ वाहतूक टप्प झाली होती. सुरक्षा म्हणून महामार्वागावरील वाहतूक सेवा रस्ता व औद्योगिक वसाहतीतून वळविण्यात आली होती.

घटनास्थळी औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशामक दल व स्थानिक पोलिस दाखल होऊन तातडीने उपाययोजना व मदत कार्य सुरू केले. आगीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशामक दलाने प्रयत्न सुरू केला. पाच क्रेनच्या साहाय्याने केमिकलचा टँकर उभा करण्यात आला.

 'कधी झाडाखाली तर कधी स्टूडिओमध्ये झोपून काढले दिवस'

पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या सुचनेनुसार उपनिरीक्षक अमृता काटे, हवालदार एस.एम.शिदे, मारुती हिरवे, राकेश फाळके, दत्तात्रय चांदणे,अमोल राऊत, एम एम पवार यांनी घटनास्थळीची बघ्यांची गर्दी पांगविणे, सुरक्षेच्यादृष्टीने काळजी घेतली. सुदैवाने आगीसारखी दुर्घटना न घडल्याने कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपन्या व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tanker of flammable chemicals overturned on pune-solapur national highway