ताराराणी यांचा पुतळा पुण्यात व्हावा - संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे - ‘‘हिंदवी साम्राज्य वाचविण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती महाराणी ताराराणी यांनी तब्बल सात वर्षे औरंगजेबाशी लढा दिला आहे. अशा महाराणी ताराराणी यांचा पुण्यात पुतळा असला पाहिजे. हा पुतळा उभारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ यात’’, अशी आर्त हाक खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घातली. 

पुणे - ‘‘हिंदवी साम्राज्य वाचविण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती महाराणी ताराराणी यांनी तब्बल सात वर्षे औरंगजेबाशी लढा दिला आहे. अशा महाराणी ताराराणी यांचा पुण्यात पुतळा असला पाहिजे. हा पुतळा उभारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ यात’’, अशी आर्त हाक खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घातली. 

संस्कृती प्रकाशनातर्फे डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर लिखित ‘भद्रकाली ताराराणी’ आणि ‘महाराणी येसूबाई’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन शनिवारी करण्यात आले. या वेळी संभाजीराजे बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस, बडोद्यातील जितेंद्र गायकवाड, दीपक साळुंखे, मेघराजराजे भोसले, सुनीताराजे पवार, दीपक साळुंखे हे या वेळी उपस्थित होते. ‘‘शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास मांडलेले अधिकृत पुस्तक पाहायला मिळत नाही. अशाप्रकारे अधिकृत पुस्तक इंग्रजी आणि हिंदी भाषेत असायला हवे,’’ असेही संभाजीराजे यांनी नमूद केले.

‘‘महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराराणी यांच्या शौर्य, वेदना आणि त्यागाकडे आजवर फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यांचे चरित्र जगाला प्रेरक ठरणार आहे. सध्या महाराष्ट्र जातीपातीने होरपळत आहे. अशा परिस्थितीत विभागलेल्या महाराष्ट्राला जोडण्यासाठी येसूबाईच्या त्यागाचा संदर्भ महत्त्वाचा ठरेल. इतिहास तटस्थपणे मांडला गेला पाहिजे,’’ असे मत डॉ. सबनीस यांनी व्यक्त केले. 

मराठा संशोधन केंद्र लवकरच 
‘‘किल्ले रायगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास उलगडणारे मराठा संग्रहालय किंवा मराठा संशोधन केंद्र लवकरच उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी गडाच्या पायथ्याशी जवळपास ८८ एकर जमीन संपादित केली आहे,’’ असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या वेळी सांगितले.

सध्या व्हॉट्‌सॲपवर वेगवेगळ्या जातीचे ग्रुप व्हायला लागलेत. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी याच माध्यमाचा प्रभावी वापर केला पाहिजे. महाराजांची वारसा सांगणारे साहित्य मोबाईलद्वारे तरुणांच्या हातात कसे पोचेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
- रामराजे नाईक निंबाळकर, सभापती, विधान परिषद

Web Title: Tararani Statue Sambhajiraje