'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'

'शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टास्क फोर्स'

पुणे - ‘‘राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे अहवाल पाहिले, तर फार चांगली परिस्थिती नाही. त्याचे कारण शिक्षकांना शिक्षणेतर काम सांगितले जाते. ही कामे करून शाळा आणि शिक्षणाची गुणवत्ता यावर लक्ष देण्यासाठी टास्क फोर्स (कृती दल) स्थापन केले जाणार आहे,’’ असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी जाहीर केले.

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची विभागीय शिक्षण परिषद पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे झाली. त्यात ते बोलत होते. बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर, शिक्षण उपनिरीक्षक अनिल गुंजाळ, शिक्षणतज्ज्ञ शहाजी ढेकणे आदींनी विविध विषयांवर मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत, डॉ. कमलादेवी आवटे, संगीता शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्ह्यातील सुमारे दोन हजारांहून अधिक मुख्याध्यापक परिषदेला उपस्थित होते.

सोळंकी म्हणाले, ‘‘देशाला उज्ज्वल भवितव्य देणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य तुम्ही घडविणार आहात, ही जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता ठेवा. तुमचे काम आश्‍वासक आहे, फक्त तुमच्या शाळेला नेतृत्व द्या. यातून शाळेबरोबरच विद्यार्थ्यांचीही प्रगती साधणार आहे. विद्यार्थ्यांना आता फक्त अध्यापन करून चालणार नाही, तर जागतिक स्तरावर तो स्पर्धा करू शकेल, असा आत्मविश्‍वास त्यांच्यामध्ये निर्माण करणारे शिक्षण त्यांना दिले पाहिजे.’’

राज्यात यापूर्वी वेगवेगळी शैक्षणिक अभियान राबविली गेली. आता त्यांना एकत्र करीत समग्र शिक्षा अभियान येत आहे. यातून दर्जावृद्धीचा सर्वंकष प्रयत्न केला जाईल. कारण शिक्षणावर दर वर्षी ५५ हजार कोटी रुपये खर्च होतो. परंतु विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थी हा मिळालेल्या ज्ञानातून स्वत:च्या पायावर उभा राहील की नाही, याचाही विचार केला पाहिजे. 

प्रयोगशील शिक्षकांचा सन्मान
राज्यात अनेक शाळांमध्ये प्रयोगशील शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना नवे आयाम देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्याचा निश्‍चितपणे गौरव केला जाईल. अशा शिक्षकांची नावे निश्‍चित करून त्यांचा सत्कार केला जाईल. याशिवाय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विभागांमार्फत शिष्यवृत्ती वितरित होतात. त्यात सुसूत्रता येण्यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल. यामुळे शिष्यवृत्तीबाबतचा गोंधळ संपेल, असे विशाल सोळंकी यांनी सांगितले.

शिक्षणतज्ज्ञांच्या  टिप्स
विद्यार्थी परीक्षार्थीपेक्षा ज्ञानार्थी बनवा. फक्त भरघोस गुण मिळविण्याची सवय त्याला लावू नका.
दहावी, बारावीचा निकाल वाढल्याने गुणवत्ता वाढत नाही. विषय, संकल्पना समजणे महत्त्वाचे. 
परीक्षेत गुण जास्त पडले म्हणून विद्यार्थी आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत पात्र ठरतोच असे 
नाही.
विद्यार्थ्यांना ‘शिकविणे’ बंद करा; त्यांनी कसे शिकावे, याची शिकवण त्यांना द्या.
पाठ्यपुस्तकातील धडे हेच सर्वज्ञान नाही. त्या पलीकडचे जग आहे, ते मुलांना दाखवा
शिकविलेले समजले नाही, हे धीटपणे सांगणारे विद्यार्थी  तयार करा. तेच खरे ज्ञानार्थी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com