male
male

नक्षलवादी होण्याची वाट पाहू नका; टाटा धरणग्रस्तांचा इशारा

माले : "ज्ञानोबा- तुकारामासह छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे आम्ही मावळे असून आत्तापर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन केले. धरणग्रस्तांची 100 वर्षांनंतरदेखील फसवणूक होत असल्याने यापुढे आक्रमक आंदोलन करून धरणावरील पूल, गावठाणासह नागरी सुविधा होईपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. कंपनीने आमच्या धरणग्रस्तांमधून नक्षलवादी होण्याची वाट पाहू नये,'' असा इशारा मुळशीचे माजी आमदार शरद ढमाले यांनी दिला. 

मुळशी धरणग्रस्तांच्या मुळशी- वाघवाडी पूल, आंबवणे- कुंभेरी- तिस्करी पूल, धरणग्रस्तांसाठी गावठाण, नागरी सुविधा या प्रलंबित प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी चाचीवली (ता. मुळशी) येथे धरणपात्रात शनिवारी "चारी बंद आंदोलन' केले, या वेळी ढमाले बोलत होते. उपस्थित धरणग्रस्तांनी पात्रातील वीजनिर्मिती केंद्रात पाणी जाणाऱ्या चारीत (कालव्यात) दगड टाकून टाटा कंपनीचा प्रतीकात्मक निषेध केला. 
या वेळी रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत कदम, अशोक कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, अशोक साठे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सचिन पळसकर, पांडुरंग निवेकर, गणपत वाशिवले, विठ्ठल पडवळ, संतोष कदम, धरण मंडळाचे माजी अध्यक्ष मारुती मापारे, अनंता वाळंज, भांबर्डेचे सरपंच श्रीराम वायकर, माजी सरपंच गोविंद सरुसे, एकनाथ दिघे, एकनाथ जांभुळकर, जयराम दिघे, वडगावच्या सरपंच अर्चना वाघ, सुभाष वाघ, माजी सरपंच दशरथ गोळे, मारुती कुडले, दत्तात्रेय कुंभार, अर्जुन पाठारे, मालेचे माजी सरपंच विजय दळवी, प्रशांत जोरी, बाळासाहेब कुरपे, मारुती कुरपे, विशाल पडवळ आदी सहभागी झाले होते. 

"कोणत्याही दडपशाहीला बळी न पडता आम्ही आंदोलन केली आहेत. आमच्या मागण्या एवढ्या छोट्या आहेत, की टाटा पॉवर कंपनीकडील भंगार विकले तरी धरणग्रस्तांचे प्रश्‍न सुटतील,' असे सांगून ढमाले म्हणाले, ""जगभर मानवतावादी चेहरा मिरवणारी टाटा कंपनी मुळशीत मात्र बेफिकीर धोरण स्वीकारून धरणग्रस्तांचा अंत पाहत आहे. धरणग्रस्तांनी प्रसंगी नक्षलवादींप्रमाणे भूमिका घेतली तर त्यास टाटा कंपनी जबाबदार असेल.'' कंपनीच्या पॉवर लाइनचे टॉवर पाडू, आत्मदहन करू; पण लढा थांबवणार नाही,' अशा प्रक्षुब्ध भावना धरणग्रस्तांनी व्यक्‍त केल्या. 
मुळशी धरण भागातील चाचीवली, गोनवडी, वडुस्ते, भादसखोंडा, वांद्रे, पिंपरी, भांबर्डे, निवे, बार्पे, मोहरी, आंबवणे, शेडाणी, पोमगाव, आदरवाडी, पळसे, गोनवडी, माले, मुळशी खुर्द, वळणे, वडगाव, वाघवाडी, शिरगाव, घुटके आदी गावांतील धरणग्रस्तांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला. 

"अर्थसंकल्पात पुलांसाठी आर्थिक तरतूद करा' 
राज्याच्या अर्थसंकल्पात मुळशी वाघवाडी व आंबवणे- तिस्करी- कुंभेरी पुलाबाबत कोणतीही तरतूद न झाल्यास 1 जुलै रोजी टाटा कंपनीच्या भीरा वीजनिर्मिती केंद्राकडे जाणाऱ्या पाण्याचा व्हॉल्व्ह बंद करण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार शरद ढमाले यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com