टाटा मोटर्सकडून वसतीगृहातील मुलांना खेळणी, पुस्तके भेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

दावडी (पुणे) : दावडी (ता.खेड) येथील श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड वसतीगृहास टाटा मोटर्स, पिंपरी येथील कर्मचाऱ्यांनी विविध वस्तु, खेळण्याचे साहित्य व पुस्तके भेट दिली.

दावडी (पुणे) : दावडी (ता.खेड) येथील श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड वसतीगृहास टाटा मोटर्स, पिंपरी येथील कर्मचाऱ्यांनी विविध वस्तु, खेळण्याचे साहित्य व पुस्तके भेट दिली.

टाटा उद्योगसमुहातर्फे दरवर्षी स्वयंसेवक महिना वर्षातून दोनदा साजरा केला जातो. टाटा समुहातील कर्मचारी स्वयंस्फुर्तीने या महिन्यामध्ये समाजातील विविध घटकांना मदत करतात. गुरूवारी (ता.२९) दावडी येथील वसतीगृहातील २६ विद्यार्थ्यांसाठी टाटा मोटर्स, पिंपरी येथील ईआरसी आऊट डोअर टेस्टींग विभागातील ८० कर्मचाऱ्यांनी गोष्टींची पुस्तके, चार पंखे, सतरंज्या, बेडशीट, धान्याची कोठी, खेळाचे साहित्य, दररोज वापराच्या गोष्टी भेट दिल्या.

रेणुका देशपांडे व नारायण जाधव यांनी मुलांचे मनोरंजनात्मक खेळ व परिक्षा घेतली. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. मार्च महिन्यात ज्यांचा वाढदिवस आहे अशा सर्व विद्यार्थी व टाटा मोटर्स कर्मचाऱ्यांचा वाढदिवस एकत्र केक कापून साजरा करण्यात आला. भेट दिलेले साहित्य, पुस्तके व खेळाचे साहित्य पाहून मुलांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वहात होता. नारायण जाधव यांनी सांगितले की, आम्ही प्रत्येक महिन्यात त्या महिन्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस एकत्र साजरा करतो व वाढदिवसासाठी एकत्र रक्कम काढून त्या रकमेतून समाजोपयोगी कार्य करतो.

यावेळी ईआरसी आऊट डोअर टेस्टींग विभागाचे प्रमुख नारायण जाधव, जगन्नाथ सरकार, रेणुका देशपांडे, शितल माळी, पवन सिंदगीकर, जयेश नाईक, संतोष गव्हाणे, सुरेश डुंबरे, अनंतराव दुंडे, ऋषीकेश बेल्हेकर, श्रीकांत कराळे, अविनाश गायकवाड व बाबासाहेब दिघे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन बाबासाहेब दिघे, सुत्रसंचालन रेणुका देशपांडे व आभार अविनाश गायकवाड यांनी मानले.

Web Title: tata moters gifted students books toys etc