लोहगाव विमानतळावर चहा-कॉफी 20-25 रुपयांत! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

पुणे - पिण्याचे पाणी 10 रुपये, चहा फक्त 20 रुपये आणि कॉफी 25 रुपये... हे दर लोहगाव विमानतळावरील आहेत, असे कोणी सांगितले असते तर एरवी विश्‍वास बसला नसता; परंतु, या दरांची अंमलबजावणी आता 15 मे पासून होणार आहे अन्‌ त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया लोहगाव विमानतळ प्रशासनाने पूर्ण केली आहे. 

पुणे - पिण्याचे पाणी 10 रुपये, चहा फक्त 20 रुपये आणि कॉफी 25 रुपये... हे दर लोहगाव विमानतळावरील आहेत, असे कोणी सांगितले असते तर एरवी विश्‍वास बसला नसता; परंतु, या दरांची अंमलबजावणी आता 15 मे पासून होणार आहे अन्‌ त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया लोहगाव विमानतळ प्रशासनाने पूर्ण केली आहे. 

लोहगाव विमानतळावरील खाद्यपदार्थांचे दर, हा प्रवाशांसाठी कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या धर्तीवर हे दर आहेत. चहा-कॉफी 60 ते 80 रुपये आणि पाण्याची बाटली 30-40 रुपयांना मिळते, तर समोसा, सॅंडविच, केक आदी खाद्यपदार्थांचे दरही 80 रुपयांपासून सुरू होतात. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चाट बसत होती. चहा- कॉफी रास्त दरात मिळावेत, अशी अपेक्षाही त्यांनी वारंवार केली होती. त्याची दखल आता लोहगाव विमानतळ प्रशासनाने घेतली आहे. या विमानतळावरून दररोज सुमारे 20 हजार प्रवाशांची वाहतूक होते. अनेकदा वेळापत्रकात बदल झाल्यामुळे विमानाची वाट पाहत प्रवाशांना थांबावे लागते. त्या वेळी त्यांची पावले चहा-कॉफीसाठी वळतात अन्‌ त्यासाठी अवाजवी दर द्यावा लागतो. 

रास्त दरात चहा-कॉफी मिळावी, यासाठी निविदा मागविल्या होत्या. सुदैवाने त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 15 मेच्या सुमारास लो-कॉस्ट स्टॉल सुरू होतील. सिक्‍युरिटी चेक इन झाल्यावर आतील बाजूला 24 तास ही सेवा उपलब्ध असेल. पुढच्या टप्प्यात प्रवाशांना किफायतशीर दरात खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 
- अजय कुमार, संचालक, लोहगाव विमानतळ 

विमानतळांवरील चहा-कॉफी, खाद्यपदार्थांचे दर परवडणारे नाहीत. त्यामुळे मी अनेकदा डबा सोबत घेऊन जातो. ही सुविधा लवकर सुरू करावी आणि त्याचा दर्जा चांगला राहील, याची काळजी घ्यावी. 
- नहुष वागळे, झोनल मॅनेजर, मेअर ऑरगॅनिक्‍स (नियमित प्रवासी) 

Web Title: Tea-coffee 20-25 rupees at ‎Lohegaon airport