शिक्षक मान्यतांची पद्धत बंद!

संतोष शाळिग्राम
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

शालेय शिक्षकभरतीसाठी आता पवित्र प्रणाली सुरू झाल्याने शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांकडून घ्याव्या लागणाऱ्या वैयक्तिक मान्यतांची पद्धत बंद होणार आहे.

पुणे - शालेय शिक्षकभरतीसाठी आता पवित्र प्रणाली सुरू झाल्याने शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांकडून घ्याव्या लागणाऱ्या वैयक्तिक मान्यतांची पद्धत बंद होणार आहे. यामुळे शिक्षकभरतीसह या मान्यता मिळविताना होणाऱ्या गैरव्यवहारालाही लगाम लागणार आहे. या निवड झालेल्या शिक्षकांची नावे थेट शालार्थ प्रणालीत समाविष्ट होणार असल्याने त्यांचा पगारही विनामान्यता सुरू होणार आहे.

शिक्षकांना नियुक्ती मिळाल्यानंतर वेतन सुरू होण्यासाठी अधिकाऱ्यांकडून मान्यता घ्यावी लागते. त्या वेळी शिक्षकांची अडवणूक करून प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला जात होता. पवित्र प्रणालीमुळे तो रोखला जाणार आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)शिक्षण विभागाने आज साडेपाच हजारांहून अधिक शिक्षकांची निवड यादी जाहीर केली आहे. यातील शिक्षकांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहेत. त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांच्या मान्यता घ्याव्या लागणार नाहीत. त्यासाठी विविध  कार्यालयांत फाइल फिरविण्याचे ‘दिव्य’देखील शिक्षकांना करावे लागणार नाही.

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी म्हणाले, ‘‘पवित्र प्रणालीतून होणारी शिक्षकांची निवड हीच त्याची मान्यता असणार आहे. मुलाखतीशिवाय निवड झालेले शिक्षक, तसेच खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये मुलाखतीनंतर नियुक्ती झालेले शिक्षक यांच्या सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी केली जाणार आहे. त्यातून पात्र ठरलेल्या शिक्षकांचा शालार्थ आयडी तयार होईल. त्यांची नावे या शालार्थ प्रणालीत समाविष्ट केली जातील आणि त्यांचे वेतन सुरू होईल. या शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांकडून वेगळी वैयक्तिक मान्यता घ्यावी लागणार नाही.’’

गैरप्रकारांना आळा बसणार
शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनीदेखील पवित्र प्रणालीमुळे मान्यता मिळविण्याची प्रथा बंद होणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘शिक्षक मान्यता घेण्यासाठी अनेकदा शिक्षकांना अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागतात. तसेच या वेळी गैरप्रकार होत असल्याच्याही तक्रारी येतात. शिक्षकांची होणारी अडवणूक आणि त्यातून होणारे गैरप्रकार आता पूर्णत: बंद होतील. यातून शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher Approval Methods closed