शिक्षकांनो, पदवीधरांची नोंदणी करा

Education
Education

पिंपरी - सध्या सर्वत्र पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. विविध राजकीय पक्षांकडून ऑफलाइन मतदान नोंदणी सुरू आहे. त्यासाठी बुधवारपर्यंत (ता. ६) अंतिम मुदत देण्यात आल्याने शिक्षण विभागानेही पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांना आपापल्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची नोंदणी तत्काळ करून घेण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीच्या सुट्यांमध्ये या निर्णयामुळे मुख्याध्यापकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी जुलैमध्ये निवडणूक होत आहे. सहा ऑक्‍टोबरपर्यंत कालावधी दिला होता. परंतु या कालावधीत विधानसभा निवडणुकीत कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत व्यग्र आहेत. दिवाळीच्या सुटीमुळे मतदारांना नोंदणीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याने नोंदणीला थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व्यवस्थापकांना शंभर टक्के मतदार नोंदणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. येत्या सहा नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शाळांमधील शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांच्या खांद्यावर टाकली आहे. नोंदणी तत्काळ करून घ्यावी, तसेच कोणीही वंचित राहणार नाही, याची नोंद घेण्याचे त्यांनी सूचित केले आहे.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शाळांना सुट्या असल्याने काही गावी गेलेले आहेत, अशातच शिक्षण विभागाकडून एकामागून एक आदेश काढण्यात येत असल्याने शिक्षक व मुख्याध्यापकांच्या सुटीवर गदा आणल्याची खंत एका मुख्याध्यापिकेने ‘सकाळ’कडे व्यक्त केली. 

मुदत वाढविण्याची मागणी
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीसाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र मतदार नोंदणी अपेक्षित झालेली नाही. त्यामुळे मतदार नोंदणीसाठीच्या ६ नोव्हेंबरच्या मुदतीला वाढ द्यावी, अशी मागणी मतदारांनी केली आहे. तसेच ही नोंदणी ऑनलाइन व्हावी, या मागणीसाठी www.change.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन दावाही करण्यात आला आहे. 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सजग नागरिक मंच, हिंजवडी आयटी पार्क रेसिडंटस वेल्फेअर असोसिएशन, हिंजवडी रेसिडंटस ॲण्ड एम्प्लॉईज ट्रस्ट, नॅशनल फ्लॅट बायर्स मूव्हमेंट-महाराष्ट्र, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटीज फेडरेशन अशा सुमारे २० संस्थांनी हे कॅम्पेन चालविले आहे. अधिक माहितीसाठी संबंधितांनी forvotingrights@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणूक विभागाकडे माहिती अधिकारात आत्तापर्यंत किती मतदारांची नोंदणी झाली, याची माहिती मागितली आहे. मात्र ती माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे मतदार नोंदणीचा नेमका आकडा सांगता येणे अवघड आहे. पक्षांशी संबंधित उमेदवारांकडून एकगठ्ठा मतदार नोंदणी झाल्यास त्याला आमचा विरोध राहील.
- युवराज पवार, संस्थापक-अध्यक्ष, डिअर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com