हाडाच्या शिक्षकाचा चालवला ज्ञानाचा वसा...

K.S.Ayyar
K.S.Ayyar

पुणे - आपल्याकडील सारे ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचे, या उद्देशानेच त्यांनी अध्यापनाचा वसा घेतला. आयुष्यभर आपल्या शिदोरीतील संपन्न ज्ञानाची पाखरण ते विद्यार्थ्यांमध्ये करीत गेले. अखेरच्या श्‍वासापर्यंत ते विद्यार्थ्यांना शिकवत राहिले, अशा हाडाच्या शिक्षकाचा शिक्षणाचा वसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या शिष्यरूपी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या प्रबंधावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.

या पुस्तक रूपाने आता बारामतीतील टी. सी. महाविद्यालयासह अन्य महाविद्यालयांत  इंग्रजीचे अध्यापन करणारे दिवंगत प्राध्यापक डॉ. के. एस. अय्यर यांचा अध्यापनाचा वसा निरंतर सुरू राहणार आहे. 

डॉ. अय्यर विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रोज यायचे. त्यासाठी मानधनही ते स्वीकारत नव्हते. त्यांनी पूर्ण निष्ठेने अध्यापन केले आणि हजारो विद्यार्थी घडविले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी अध्यापन क्षेत्रात पाऊल ठेवले. डॉ. अय्यर यांचे ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या गुरूंना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यासाठी त्यांचा ‘पीएच.डी’चा प्रबंध ‘नाईनटीथ सेन्चुरी हिस्टॉरीकल नॉव्हेल्स’ पुस्तक रूपात प्रकाशित केला. या पुस्तकाचे नुकतेच पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

‘डॉ. अय्यर अत्यंत निष्ठावान शिक्षक होते. नेट-सेटच्या परीक्षार्थींना शिकविण्यासाठी ते रोज विद्यापीठात येत होते,’’ अशी आठवण विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अशोक चासकर यांनी सांगितली. डॉ. अय्यर यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी त्यांचे पीएच.डी. प्रबंधाचे मार्गदर्शक डॉ. प्रशांत सिन्हा, त्यांचे विद्यार्थी डॉ. प्रभंजन माने, डॉ. संजय खिलारे आणि इतर संबंधितांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

विद्यार्थ्यांना शिकविण्यातच कायम रमणारा शिक्षक म्हणून डॉ. अय्यर यांच्याकडे पाहता येईल. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या ज्ञानाची प्रचिती इतरांनाही व्हावी, म्हणून पुस्तक प्रकाशित केले आहे.
- संजय खिलारे, प्राध्यापक, विद्या प्रतिष्ठानचे कला व वाणिज्य महाविद्यालय (बारामती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com