शिक्षकभरती आचारसंहितेपूर्वी : शिक्षणमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पुणे : शिक्षक आणि प्राध्यापक भरतीमध्ये शाळा-महाविद्यालयांतील रोस्टर पडताळणीची अडचण असून, भरतीसाठी ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक आहे. परंतु, निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली. 

पुणे : शिक्षक आणि प्राध्यापक भरतीमध्ये शाळा-महाविद्यालयांतील रोस्टर पडताळणीची अडचण असून, भरतीसाठी ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक आहे. परंतु, निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली. 

राज्य शिक्षण मंडळातील मुक्त विद्यालय मंडळाच्या उद्‌घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शाळांमधील शिक्षक भरतीसाठी "पवित्र प्रणाली' आणण्यास विलंब होत असल्याबद्दल विचारले असता तावडे म्हणाले, ""संस्थाचालकांबरोबर यासंबंधी बैठक झाली आहे. या भरतीसाठीदेखील रोस्टर पडताळणी आवश्‍यक आहे. या प्रणालीचे काम पूर्ण होत आले आहे. उमेदवार निवडण्याचा अधिकार संस्थांना असेल. मात्र, पात्र उमेदवारांची यादी मात्र शालेय शिक्षण विभागाकडून संस्थांकडे जाईल. त्याची मुलाखत त्यांनी घ्यायची आहे. त्याचे चित्रीकरण करणे बंधनकारक आहे. यातून गुणवत्तेला न्याय मिळेल.'' 

""महाविद्यालयांमध्ये सुमारे चार हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यांच्याकडे रिक्त जागांची माहिती मागवली आहे. मराठा आरक्षणामुळे रोस्टर पडताळणी संस्थांना करावी लागत आहे. त्यांच्याकडून जागांची माहिती आल्यानंतर भरतीप्रक्रिया सुरू होईल. निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यापूर्वी भरती करण्याचा आमचा प्रयत्न आहे,'' असे तावडे यांनी स्पष्ट केले. 

पदनाम बदलाची चौकशी 

राज्यातील सहा विद्यापीठांमध्ये नोकरीचे पद बदलून अनेक कर्मचाऱ्यांनी जादा वेतन उकळले आहे. याबद्दल तावडे म्हणाले, ""अनेक कुलगुरू या प्रकरणात अडकले आहेत. त्यांची चौकशी करण्याचे आदेश राजकीय व्यक्तीने देण्यापेक्षा राज्यपाल देतील. परंतु, या प्रकरणी चौकशी होईल आणि जादा घेतलेले वेतनही वसूल केले जाईल.'' 

पगड्यांपेक्षा शिक्षण द्या! 

सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवीप्रदान समारंभासाठी "ड्रेसकोड' बदलला आहे. त्यामुळे समारंभासाठी येणाऱ्या पाहुण्यांना विद्यापीठाने पुणेरी पगडी देऊ नये. त्याऐवजी फुले पगडी द्यावी, अशी मागणी होत आहे. याबाबत तावडे यांना विचारले असता, ""पुणे विद्यापीठाने पगड्यांपेक्षा शिक्षण द्यावे,'' असे सांगत त्यांनी वादग्रस्त विषयावर अधिक बोलणे टाळले.

Web Title: Teacher Recruitment before Code of Conduct says Education Minister Tawde