दुरावा टाळण्यासाठी अंतराचा आधार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

भवानीनगर - काझड ते सणसर या इंदापूर तालुक्‍यातील दोन गावांतील अंतर पाच किलोमीटरचे. पण एसटी बसच्या रूटनुसार ते भरते तीस किलोमीटर. याच अंतराच्या नियमाचा फायदा उठवत बदलीस पात्र असणाऱ्या काही पती-पत्नी शिक्षकांनी जवळची शाळा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

असाच प्रकार बारामती तालुक्‍यातील पारवडी ते माळेगाव १८ किलोमीटरच्या गावांतही होऊ शकतो. बसने प्रवास केल्यास हे अंतर ३२ किलोमीटर भरते.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या संवर्ग एक आणि दोनच्या बदल्या होणार, हे निश्‍चित झाल्याने अस्वस्थ झालेल्या शिक्षकांनी आता नवनवीन शक्कल आणि क्‍लृप्त्या लढवायला सुरवात केली आहे. पती-पत्नी एकत्रीकरणाचा फायदा घेत बसच्या प्रवासातून दोघांमधील अंतर कसे तीस किलोमीटरपेक्षा अधिक होते, हे दाखविण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविण्यास शिक्षकांनी सुरवात केली आहे. वरील दोन्ही गावांची नावे ही प्रातिनिधिक व उदाहरण दाखल आहेत.

मात्र ज्या गावांमध्ये थेट बस जाऊ शकत नाही, अशा गावांची एसटी बसच्या फेऱ्यांमधून होणाऱ्या किलोमीटर अंतराची यादी जोडण्यास त्यांनी सुरवात केली आहे. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी राज्य परिवहन महामंडळांचे दाखलेही घेण्यास सुरवात केल्याची खात्रीलायक माहिती आहे.

सुगम, दुर्गम भागातील बदल्यांच्या अस्वस्थतेनंतर आता पती-पत्नी शिक्षक असलेल्यांच्या या करामतीने बाकीचे शिक्षक हवालदिल झाले आहेत. पती-पत्नीच्या नावाखाली आपली लांब फरफट होणार असल्याची भीती त्यांना वाटू लागली आहे.

Web Title: teacher transfer