चुकीची माहिती भरल्यास फौजदारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पुणे - जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया ही पारदर्शक; तसेच वस्तुस्थिती व नियमाला धरूनच राबवावी. यामध्ये जाणीवपूर्वक चुकीची किंवा वस्तुस्थितीशी विसंगत माहिती शिक्षकांनी भरू नये, यासाठी खबरदारी घेण्याची सूचना त्यांना द्यावी. वस्तुस्थितीची विसंगत माहिती जाणीवपूर्वक भरल्याचे निदर्शनास आल्यास अशा शिक्षकांवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शैलजा दराडे यांना दिला.

बदल्यांमधून सवलत मिळण्यासाठी काही शिक्षक जाणीवपूर्वक संगणक प्रणालीत खोटी माहिती भरत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

याबाबतचे ‘दुरावा टाळण्यासाठी अंतराचा आधार’ या मथळ्याचे वृत्त बुधवारी (ता. १८) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. या वृत्ताची गंभीर दखल घेत मांढरे यांनी हा आदेश दिला. दरम्यान, याआधीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. २०१६ मधील बदली प्रक्रियेत तर चक्क खोट्या लेटरहेडचा वापर करून काही बोगस शिक्षक पुढाऱ्यांनी बदलीतून सवलत मिळविली. या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर या आदेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

सध्या पुणे जिल्ह्यात जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये पती-पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजाराने त्रस्त, अपंग, विधवा, परित्यक्ता आदींसाठी काही अंशी सवलत देण्याची तरतूद आहे. पती-पत्नी एकत्रीकरणासाठी दोघांच्या शाळांमधील अंतर ३० किलोमीटरपेक्षा जास्त असावे, असा नियम आहे. प्रत्यक्षात काही पती-पत्नींच्या शाळांमधील अंतर यापेक्षा कमी आहे. मात्र बसच्या मार्गानुसार ते तीस किलोमीटरपेक्षा जास्त होते. नेमका याचाच फायदा घेत, अशी दांपत्ये एकत्रीकरणाचा लाभ मिळविण्यास पुढे सरसावू लागली आहेत. केवळ आणखी जवळची शाळा मिळावी, हाच त्यांचा उद्देश आहे. 

कागदपत्रांची काटेकोर तपासणी
बदलीतून सवलत देण्याबाबत असलेल्या नियमांची पूर्तता ही केवळ कागदोपत्री होता कामा नये. त्यासाठी संबंधितांनी सादर केलेले पुरावे खरे की खोटे, याचीही काटेकोर तपासणी करावी, या तपासणीत कोणी चुकीची किंवा वस्तुस्थितीशी विसंगत माहिती भरून जिल्हा परिषद प्रशासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शिक्षकावर कठोर प्रशासकीय कारवाई आणि फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचे सूरज मांढरे यांनी सांगितले.

Web Title: teacher transfer wrong information crime