शिक्षक भरतीच्या 'पवित्र' हेतूला ग्रहण

शिक्षक भरतीच्या 'पवित्र' हेतूला ग्रहण

पुणे : शिक्षक भरतीवेळी होणारा बाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने पवित्र हेतूने भरतीसाठी पवित्र प्रणाली आणली. परंतु त्यालाच "ग्रहण' लागले आहे. राज्यातील हजारो जण भरती सुरू होण्याची प्रतीक्षा करीत असताना रोस्टर पडताळणीच्या प्रक्रियेत त्याला विलंब होत आहे. शिवाय सरकारनेही नवा आदेश काढत एक पदासाठी संस्थांना दहा उमेदवारांची मुलाखत घेण्यास मुभा दिल्याने भरती प्रकियाच संशयाच्या फेऱ्यात अडकणार आहे. 

अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेऊन भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला. चाचणीतील गुणवान उमेदवारांस संस्थांनी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याची पवित्र पद्धत निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार पवित्र पोर्टलवर उमेदवारांची माहिती अपलोड होऊ लागली. परंतु मुलाखत घेण्याचा खासगी शिक्षण संस्थांचा अधिकार आहे, असे म्हणत संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर मुलाखतीची पद्धत ठरवून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

राज्य सरकारने नवी पद्धती निश्‍चित केली आहे. त्यात संस्थेमध्ये एक पद असेल, तर त्यासाठी दहा उमेदवारांची मुलाखत घेण्याची मुभा दिली आहे. याशिवाय मुलाखतीसाठी 30 गुण ठेवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकाची निवड अभियोग्यता चाचणीतील गुणवत्तेपेक्षा मुलाखतीवर ठरणार असल्याने भरती प्रक्रियेत पुन्हा गैरव्यवहार होण्याची चिंता भावी शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. 

भरतीप्रक्रिया लांबणार? 

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी पवित्र प्रणालीद्वारे अर्ज करायचे आहेत. संस्थांनी रिक्त जागा निश्‍चित करून रोस्टर पडताळणी करून घ्यायची आहे. राज्यातील सुमारे दीड हजार संस्थांनी पडताळणीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रकरणे पाठविली आहेत. त्यांच्याकडून ती मागास वर्ग कक्षाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात विलंब होण्याबरोबरच या कक्षाचे काम संथ गतीने होत असल्याने अंतिम पडताळणीला विलंब होत आहे. त्यामुळे भरतीप्रक्रिया सुरू होण्याची अजूनही शक्‍यता नाही. 

अधिकाऱ्यांना आशा 

माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांना याबाबत विचारले असता त्यांनी रोस्टर पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. सुटीच्या काळातही हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे ते लवकरच पूर्ण होईल. त्यानंतरच भरतीप्रक्रियेस सुरवात होईल, असे सांगितले. प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी, प्राथमिक शाळाचे पडताळणीचे काम नव्वद टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले. 

आम्ही आधी डीएड, मग शिक्षक पात्रता परीक्षा, अभियोग्यता चाचणी देऊन गुणवत्ता सिद्ध केली आहे. आता सरकारने मुलाखतीसाठी 30 गुण ठेवले आणि एका पदाला दहा जणांची मुलाखत घेण्याची मुभा संस्थांना दिली. मग परीक्षांच्या चाळण्या कशासाठी? 

- संतोष मगर, अध्यक्ष, डीएड, बीएड स्टुडंट्‌स असोसिएशन 
पवित्र पोर्टल जोड 

रोस्टर पडताळणी स्थिती 

माध्यमिक 
पदभरणीचे प्रस्ताव 1492 
रोस्टर पडताळणी झालेले 800 
पवित्र पोर्टलवर अपलोड 421 
प्रलंबित 600 

प्राथमिक 
पदभरणीचे प्रस्ताव 400 
रोस्टर पडताळणी झालेले 300 
पवित्र पोर्टलवर अपलोड 300 
प्रलंबित 100 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com