शिक्षक सप्टेंबरच्या वेतनापासून वंचित 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पुणे : वेतन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संगणक प्रणालीच्या वापरात त्रुटी राहिल्याने पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडील सुमारे चार हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळाले नाही. या त्रुटी दूर करण्यात आल्या असून, लवकरच वेतन जमा होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. 

पुणे : वेतन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संगणक प्रणालीच्या वापरात त्रुटी राहिल्याने पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडील सुमारे चार हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळाले नाही. या त्रुटी दूर करण्यात आल्या असून, लवकरच वेतन जमा होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. 

सणासुदीचे दिवस असून, वेतनाचा नियमित दिवस उलटून दहा दिवस झाल्यानंतरही खात्यावर पैसे जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी लेखाधिकारी उल्का कळसकर यांच्याकडे विचारणा केली. त्या वेळी शिक्षण मंडळाकडून पाठविण्यात आलेल्या वेतनासंदर्भातील अहवालात काही त्रुटी आढळल्या आहेत. एकच कोड क्रमांक दोन तीन कर्मचाऱ्यांना दिला गेला, एकाच कर्मचाऱ्याच्या नावावर अधिक कोड क्रमांक अशा विविध गोष्टी आढळून आल्या आहेत. त्यामध्ये दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले. ती दुरुस्ती करून आल्यानंतरच वेतनाची रक्कम जमा करता येईल, असे कळसकर यांनी स्पष्ट केले. 

शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे मंडळाकडील वेतन संगणकीय प्रणालीचा वापर करून दिला जात होता. आता शिक्षण मंडळाकडील कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकरीता वापरल्या जाणाऱ्या संगणक प्रणालीचा ( सॉफ्टवेअर ) वापर सुरू केला आहे. यामुळे अडचण निर्माण झाल्याचा दावा शिक्षण विभागाचे प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी केला.

"लेखाविभागाने सांगितलेल्या त्रुटी दूर करण्याचे काम करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाले असून, लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनाचे पैसे जमा होतील,'' असा दावा त्यांनी केला. पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे सुमारे साडेचार हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचा पूर्ण डाटा या प्रणालीमध्ये भरण्याचे काम चार महिन्यांपासून सुरू होते. ते काम पूर्ण झाले आहे, त्यातील त्रुटी दूर झाल्या असून, पुढील महिन्यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षण मंडळाकडील कर्मचाऱ्यांचे वेतन दहा तारखेच्या आत जमा होईल.'' 

प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला महापालिका या कर्मचाऱ्यांचे वेतन बॅंकेत जमा करते. या महिन्यात 19 तारीख येऊनही वेतन मिळाले नाही. बॅंक कर्जाचे हप्ते आणि अन्य देणी ही वेतनावर अवलंबून असतात. वेतन वेळेवर न मिळाल्याने ही कर्जाचे हप्ते, इतर देणी देण्यास विलंब झाला आहे. सणाच्या कालावधीच वेतन वेळेवर न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.  

Web Title: The teachers salary pending of September