संगीत शिक्षणासाठी तंत्रज्ञानाची मदत

संतोष शाळिग्राम 
बुधवार, 17 एप्रिल 2019

संकेतस्थळावर हा खजिना 
भूप, काफी, देस, यमन, बसंत अशा अनेक रागांची सरगम गीते, बंदिशी, लक्षण गीतांची नोटेशन संकेतस्थळावर आहेत. काही चित्रपट गीतांचीही स्वरलिपी, तसेच तीनताल, रूपक, झपताल अशा वेगवेगळ्या तालांतील अनेक पेशकार, कायदे, रेले, तुकडे व बंदिशी आहेत. विद्यार्थ्यांना उपयुक्त लेखही आहेत. सूरसमूह श्रवण करून ओळखणे, मेरुखंड जनरेटर, तिहाई जेनेरेटर यात आहेत. कोणत्याही तालातील तिहाई, चक्रधार तिहाई, दर्जे की तिहाई, तुकडा, चक्रधार आपल्याला एका क्‍लिकवर मिळतो.

पुणे  - अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रसार तंत्रज्ञानामुळे होत असताना आता ते शिकण्यासाठीदेखील तंत्रज्ञान उपयोगी पडू लागले आहे. पुण्यातील एका संगणक अभियंत्याने संगीत शिक्षणासाठी वेबआधारित सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यात स्वरलिपीसह बंदिशीचा खजिना आहे.  

पुण्यातील शिवराज सावंत हे एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करतात. ते तबलावादकही आहेत. त्यांनी स्वत:कडील ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम साधत सॉफ्टवेअर विकसित केले. ‘विश्‍वमोहिनी डॉट कॉम’ या संकेतस्थळाद्वारे ते मोफत शिक्षणासाठी खुले करून दिले आहे. 

याबाबत सावंत म्हणाले, ‘‘पाश्‍चात्त्य संगीत लेखन करून ते वाजविण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर, संकेतस्थळे आहेत. तसेच, काही भारतीय शास्त्रीय संगीतासाठी असावे, या संकल्पनेतून प्रयत्न केले. गेली तीन वर्षे त्यावर काम करीत होतो.’’

सॉफ्टवेअरबद्दल ते म्हणाले, की यामध्ये आपण सूर व तबल्याच्या नोटेशन, बंदिशी लिहू शकतो. लिहिलेल्या बंदिशी भातखंडे संगीत लिपीमध्ये बघू शकतो. संकेतस्थळावर नोंदणी करून; विद्यार्थी नोटेशन पोस्टही करू शकतात. सध्या चारशेहून अधिक बंदिशी आहेत.

Web Title: Technological help for music education Shivraj Sawant