तंत्राच्या उदरात मायेचा अंकुर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

पुणे - देशातील दुसरे गर्भाशय प्रत्यारोपण झालेल्या महिलेच्या उदरात गर्भ वाढत आहे. त्याच्या हृदयाची स्पंदने आता सोनोग्राफीमधून जाणवत आहेत. त्यामुळे प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून देशातील पहिल्या बाळाचा पुण्यात जन्म होईल, अशी अपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.

पुणे - देशातील दुसरे गर्भाशय प्रत्यारोपण झालेल्या महिलेच्या उदरात गर्भ वाढत आहे. त्याच्या हृदयाची स्पंदने आता सोनोग्राफीमधून जाणवत आहेत. त्यामुळे प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून देशातील पहिल्या बाळाचा पुण्यात जन्म होईल, अशी अपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.

गॅलॅक्‍सी केअर रुग्णालयात एकापाठोपाठ एक अशा दोन गर्भाशय शस्त्रक्रिया झाल्या. या शस्त्रक्रियांना येत्या शुक्रवारी (ता. 18) एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केलेल्या पाठपुराव्यातून ही माहिती पुढे आली.

बडोद्यातील 24 वर्षीय महिलेच्या शरीरात तिच्या आईनेच दान केलेले गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले होते. प्रत्यारोपित गर्भाशयात नैसर्गिक प्रसूतीला मर्यादा असतात, त्यामुळे स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून गर्भ निर्माण करण्यात आला आहे. तो गर्भ आता गर्भाशयात सोडण्यात आला आहे. प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयात त्या गर्भाची वाढ होत आहे.

गेल्या वर्षी 18 मे रोजी सोलापूर येथील एका महिलेवर देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या गर्भाशयात गर्भदेखील सोडण्यात यश आले होते. पण, ही गर्भधारणा पूर्ण होऊ शकली नाही.

गॅलॅक्‍सी केअर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, 'गर्भाशय प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता सुरक्षित प्रसूतीचे आव्हान आमच्यासमोर आहे. त्यासाठी प्रत्येक टप्प्यावर योग्य काळजी घेतली जात आहे. नियमितपणे रुग्णाची तपासणी करण्यात येत आहे.''

स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ज्ञ डॉ. मिलिंद तेलंग म्हणाले, 'ही प्रसूती पूर्ण करणे मोठे आव्हान आहे. कारण, प्रत्यारोपित गर्भाशयाला प्रतिकार करू नये, यासाठी एका बाजूने रुग्णाला औषधे सुरू आहेत. त्याचवेळी, या औषधांचा गर्भावर परिणाम होऊ नये, याची काटेकोरपणे काळजी घ्यायची आहे.''

वर्षात पाच यशस्वी शस्त्रक्रिया
वर्षभरात गर्भाशय प्रत्यारोपणाच्या पाच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली. या दरम्यान, सुमारे पाचशे रुग्णांनी या शस्त्रक्रियेसाठी तपासणी केली. त्यापैकी काहींनी आपली नावेही नोंदविली आहेत. केवळ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातूनच नव्हे, तर देशाच्या विविध राज्यांमधून रुग्ण येथे आल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

Web Title: technology Uterine implants women pregnant