व्हर्च्युअल क्‍लासरूममुळे ‘टेक्‍नोसॅव्ही’चा अनुभव

रेश्‍मा निर्मळ यादव, खानापूर
बुधवार, 4 डिसेंबर 2019

व्हर्च्युअल क्‍लासरूममध्ये थोडेसे दडपण आले होते. परंतु, अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून अध्ययन आणि अध्यापनाचा अनुभव घ्यायचा असल्याने आत्मविश्‍वासाने सामोरे गेले. ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील ३६ शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत मला पोचता आले, याचा मला खूप आनंद वाटतो.

व्हर्च्युअल क्‍लासरूममध्ये थोडेसे दडपण आले होते. परंतु, अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून अध्ययन आणि अध्यापनाचा अनुभव घ्यायचा असल्याने आत्मविश्‍वासाने सामोरे गेले. ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील ३६ शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत मला पोचता आले, याचा मला खूप आनंद वाटतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणेतर्फे नंदुरबार, पालगर, गडचिरोली, नाशिक जिल्ह्यांतील शासकीय ३६ शाळांतील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी राज्य शासनाने ‘व्हर्च्युअल क्‍लासरूम’ हा उपक्रम जुलै महिन्यापासून सुरू केला आहे. नव्याने बदलेला अभ्यासक्रम व कृतिपत्रिका त्यात गणित, इंग्रजी आणि विज्ञानसारख्या विषयांतील क्‍लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना समजाव्यात, यासाठी पुणे जिल्ह्यातील काही तज्ज्ञ शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. 

मला या व्हर्च्युअल क्‍लासरूमला शिकवण्यासाठी विस्तार अधिकारी सुधाकर यादव यांनी संपर्क साधला. यासाठी पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष रोहिदास एकाड यांनी मार्गदर्शन केले. माझा ‘व्हर्च्युयल’मध्ये शिकवण्याचा पहिलाच अनुभव होता. माझे शिक्षण एमएस्सी बीएड, डीएसएम असून वनस्पतिशास्त्र हा माझा मुख्य विषय आहे. विज्ञानातील विविध संकल्पना माझ्या शाळेत शिकवत असताना एखादी चूक झाली तरी ती लगेच दुरुस्त करणे शक्‍य व्हायचे; परंतु व्हर्च्युअल क्‍लासरूममध्ये कॅमेऱ्यासमोर शिकवताना दडपण आले होते; परंतु अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून अध्ययन आणि अध्यापनाचा अनुभव घ्यायचा असल्याने आत्मविश्‍विासाने अध्यापन केले. विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील सामाजिक आरोग्य हा घटक शिकवण्यासाठी मी पॉवर पॉइंट स्लाइडचा उपयोग केला.

मुलांना काही प्रश्‍न विचारून त्यांचे पूर्वज्ञान जागृत केले व घटकातील विविध मुद्यांवर चर्चा घडवून आणली. प्रसारमाध्यमे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर, धोके यासंदर्भात चामोर्शी शाळेतील एका विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्‍न मला शिक्षक म्हणून अंतर्मुख करणारा होता. 

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील ३६ शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाअंतर्गत मला पोचता आले याचा मला खूप आनंद वाटतो. मुलांना अध्यापन करत असताना नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा अनुभव मला यानिमित्ताने आला. विज्ञाननिष्ठ होतकरू पिढीसाठी शासनाच्या या उपक्रमात सहभागी होता आले यासाठी विद्या प्राधिकरण, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ व महात्मा गांधी विद्यालय, खानापूरचे प्राचार्य सुनील कदम व पर्यवेक्षक राजाराम गायकर यांचीदेखील यात विशेष मदत झाली.
(शब्दांकन - राजेंद्रकृष्ण कापसे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technosavvy Experience Due to Virtual Classroom