'तेजस्विनी' महिलांना हवी-हवीशी !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

महिलांसाठीच्या बसला मिळणारा वाढता प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. प्रवासासाठी महिलांना सुरक्षितता लाभली आहे. दोन महिन्यांत महिलांसाठीच्या बसची संख्या 66 होणार आहे. महिला स्पेशलला मिळणारा प्रतिसाद असाच वाढता राहिला, तर आणखी बस घेण्यात येतील. 

- नयना गुंडे, अध्यक्ष, पीएमपी

पुणे : नव्या स्वच्छ बस, त्यात बसायला मिळणारी जागा, महिला कंडक्‍टर अन्‌ मुख्य म्हणजे सुरक्षितता... यामुळे "लेडीज स्पेशल तेजस्विनी' बससेवा महिलांना हवीहवीशी वाटू लागली आहे. या बसला प्रवासी महिलांचा प्रतिसादही वाढू लागला आहे. मात्र, अजूनही महिलांच्या बसमध्ये अधूनमधून होणारी पुरुषांची घुसखोरी महिलांना अस्वस्थ करीत आहे. 

राज्य सरकारने दिलेल्या विशेष निधीतून शहरात 33 तेजस्विनी बस आल्या आहेत. गेल्या वर्षी महिला दिनाचे (8 मार्च) औचित्य साधूनही बससेवा सुरू झाली. आता आणखी 33 बस मंजूर झाल्या आहेत. त्यातील 6 बस दाखल झाल्या आहेत, तर उर्वरित बस अल्पावधीत येणार आहेत. 

स. प. महाविद्यालयात कला शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी रेश्‍मा पूर्वी नेहमीच्या बसमधून प्रवास करायची. त्यात गर्दीच्या वेळा बसमध्ये बसायला जागा मिळत नव्हती. महिलांच्या जागांवर पुरुष प्रवासी बसलेले असायचे. शिवाय बसमध्ये होणाऱ्या छेडछाडीमुळे तिला बस प्रवास नकोसा वाटायचा. आता मात्र महिला स्पेशल बसमुळे दिलासा मिळाला आहे. छेडछाडीचा तर प्रश्‍नच उद्‌भवत नाही. त्यामुळे मी हमखास लेडीज स्पेशलमधूनच प्रवास करते, असा अनुभव रेश्‍माने "सकाळ'शी बोलताना सांगितला.

पार्वती कांबळे याही पर्णकुटीपासून स्वारगेटदरम्यान महिलांसाठीच्या बसने नेहमी प्रवास करतात. कामानिमित्त त्यांना दररोज शहरात यावे लागते. त्यामुळे प्रवास करण्यासाठी त्या आता हमखास लेडीज स्पेशलचाच वापर करतात. मात्र, या बसची संख्या कमी असून फेऱ्याही कमी आहेत, अशीही तक्रार त्यांनी केली.

आशा शिंदे याही अधूनमधून महिलांसाठीच्या बसचा वापर करतात. परंतु, महिला प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे कधी-कधी पुरुष प्रवाशांना त्यात घेतले जाते. त्याला शिंदे यांनी आक्षेप घेऊन पीएमपीकडे तक्रारही नोंदविली आहे. तेजस्विनी बस चांगल्या आहेत. परंतु, त्यांची संख्या वाढविली पाहिजे अन्‌ वेळापत्रकानुसार त्या धावल्या पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

लेडीज स्पेशल तेजस्विनी बससेवेचे मार्ग क्रमांक आणि मार्ग 
---------- 
2- कात्रज- शिवाजीनगर 
24 - कात्रज- महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (येरवडा) 
64- हडपसर- वारजे माळवाडी 
82- वारजे माळवाडी- महापालिका भवन 
103 - कात्रज- कोथरूड 
111- भेकराईनगर - महापालिका भवन 
121- महापालिका भवन - भोसरी 
158 - मनपा - लोहगाव 
372 - भक्ती शक्ती - हिंजवडी फेज 3 
117 - स्वारगेट - धायरी 
123 -मनपा - भक्ती शक्ती 
---------------------- 
- 8 मार्च 2018 ते 7 फेब्रुवारी 2019 दरम्यान महिला बसमधील प्रवासी ः 33 लाख 12 हजार 354 
- प्रवासी महिलांची रोजची सरासरी संख्या ः 9 हजार 829 
- महिला बसचे वार्षिक उत्पन्न ः 3 कोटी 96 लाख 66 हजार 983 रुपये 
- महिला बसचे मासिक उत्पन्न ः 36 लाख 48 हजार 892 रुपये 
- पीएमपीच्या ताफ्यातील महिला बस ः 36 
- दीड महिन्यात आणखी बस येणार ः 27 
- महिला वाहकांची संख्या ः 138

Web Title: Tejaswini Bus women should want to