पुणे : तरुणीची आत्महत्या नव्हे, खूनच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

- प्राथमिक शवविच्छेदन अहवालात निष्पन्न; सिंहगड रस्ता परिसरातील घटना 

पुणे : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरामधील एका सोसायटीतील घरामध्ये मृतावस्थेत आढळलेल्या तरुणीचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. तसेच तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतर तरुणीवर अत्याचार झाले आहेत किंवा नाही, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबादची घटना ताजी असतानाच तरुणीच्या खुनाचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

तेजसा श्‍यामराव पायाळ (वय 29, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजसा तिची आई व दोन बहिणी अशा चौघी माणिकबाग परिसरातील राधाकृष्ण सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेमध्ये राहत होत्या. तेजसाचे वडील त्यांच्या मूळ गावी बीड येथे राहतात. त्यामुळे तेजसासह चौघीही दिवाळीनिमित्त गावी गेल्या होत्या.

तेजसा नोकरीच्या शोधात होती. तिला सोमवारी (ता. 2) एका ठिकाणी मुलाखतीसाठी जायचे असल्याने ती काही दिवसांपूर्वी पुण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी (ता. 30) रात्री एक वाजल्यापासून तिचा मोबाईल बंद होता. त्यामुळे तेजसाच्या आई सोमवारी सकाळी पुण्यात घरी परतल्या. दरवाजा बाहेरून बंद केला होता. त्यांनी त्यांच्याकडील चावीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना तेजसा गादीवर मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, याप्रकरणी तत्काळ सिंहगड पोलिसांना खबर देण्यात आली.

...मुलाखतीच्या दिवशीच मृत्यूने गाठले 

तेजसा हिने 'एमबीए-एचआर' झाल्यानंतर काही ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार तिला सेनापती बापट रस्त्यावरील एका नामांकित कंपनीमध्ये मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. सोमवारी संबंधित कंपनीमध्ये तेजसाची मुलाखत होती. मात्र, त्याच दिवशी तिला मृत्यूने गाठले. 

ओळखीच्या व्यक्तींवर कुटुंबाचा संशय 

तेजसासमवेत तिच्या आईचे शनिवारी रात्री साडेदहा वाजता मोबाईलवर बोलणे झाले होते. त्या वेळी आपली तब्येत ठीक नसून घरातच आराम करीत असल्याचे तिने आईला सांगितले होते. त्यानंतर तिच्या आईने मध्यरात्री फोन केला तेव्हापासून तिचा फोन बंद होता. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी तिच्या ओळखीच्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejsa Payal did not Suicide it was Murder