टेलिकॉमचे जाळे विस्तारण्यासाठी हवे कुशल मनुष्यबळ - कुमार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

पुणे - ""तंत्रज्ञानाची स्मार्टसिटीमध्ये महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्यासाठी टेलिकॉमचे जाळे तयार करावे लागणार असून, यासाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ लागणार आहे,'' असे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. 

पुणे - ""तंत्रज्ञानाची स्मार्टसिटीमध्ये महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्यासाठी टेलिकॉमचे जाळे तयार करावे लागणार असून, यासाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ लागणार आहे,'' असे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. 

"टेलिकॉम सेक्‍टर स्किल कौन्सिल'च्या वतीने "एमसीसीआयए' येथे आयोजित टेलिकॉम क्षेत्रातील उद्योग आणि शिक्षण संस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. टेलिकॉम सेक्‍टर स्किल कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एस. पी. कोचर, महाराष्ट्राचे विभागीय प्रमुख प्रदीप जसवानी, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे सहसंचालक डॉ. चंद्रकांत निनाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. के. सी. मोहिते, ऍस्पायर नॉलेज अँड स्किल्सचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी आदी उपस्थित होते. पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख तसेच ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर उपस्थित होते. 

कुमार म्हणाले, ""मजबूत कनेक्‍टिव्हिटी आणि सेन्सॉर ग्रीडच्या साह्याने संपूर्ण शहराचे आपण मध्यवर्ती ठिकाणाहून परीक्षण करू शकतो. यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता असून, शैक्षणिक संस्थांनी असे मनुष्यबळ तयार करण्याचे आव्हान स्वीकारावे.'' 

कोचर म्हणाले, ""टेलिकॉम सेक्‍टर स्किल कौन्सिलने अशा प्रकारचे सक्षम कुशल मनुष्यबळ करण्यासाठी विदेशी कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांबरोबर करार केले आहेत. टेलिकॉम सेक्‍टर स्किल कौन्सिलने तैवानबरोबर कुशल मनुष्यबळ निर्यात करण्यासंबंधी करार केला आहे.'' 

संजय गांधी म्हणाले, ""ऍस्पायर नॉलेज अँड स्किल्सच्या वतीने शैक्षणिक संस्था, विद्यापीठे व उद्योग यांच्यामध्ये करार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये इंटर्नशिप करता येईल व त्यांना नोकरीही मिळेल.'' सूत्रसंचालन वर्धा भिडे यांनी केले, तर आभार संचालक हुसेन हाजीते यांनी मानले. 

Web Title: Telecom network should be able to expand