उन्हाचा पारा उतरला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

पुणे - राज्यातील उन्हाचा चटका अंशतः कमी झाला असून, पुढील चोवीस तासांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. पुण्यातही पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमानाचा पारा उतरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहरात शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 38.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तसेच चंद्रपूर येथे राज्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर कोकण गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे.

येत्या तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, तर पुढील चार दिवसांत गोव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे.

पुण्यात किमान तापमानाचा पारा अंशतः कमी झाला असली तरीही रात्रीचे तापमान 7.6 अंश सेल्सिअसने वाढून 25.7 अंश नोंदले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमानाचा पाराही उतरेल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

Web Title: temperature decrease in pune