काश्मीर नव्हे, हे आंबेगाव आहे.. वाहनांवर साचले बर्फाचे थर!

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

गेल्या १५ दिवसांपासून थंडीपासून अंशत: दिलासा मिळाला होता. मात्र गुरूवार (ता. ७), शुक्रवार (ता. ८) पासून थंडीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. नागरिक पुन्हा शेकोटीकडे वळले आहेत. नारोडी येथे विजय पवार यांच्या कारवर तसेच आदर्शगाव गावडेवाडी येथील बापू निघोट यांच्या दुचाकीवर बर्फाचा थर साचला होता.

मंचर : आंबेगाव तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द, वडगाव काशिंबेग, निघोटवाडी, आदर्शगाव गावडेवाडी, एकलहरे, चांडोली 
खुर्द येथे थंडीचे प्रमाण अधिक होते तर नारोडी येथे शनिवारी पहाटे ५.६ नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. अनेक वाहनांवर बर्फाचे थर साचले होते. त्यामुळे 
परिसरातील गावांमध्ये हुडहुडी भरली आहे. पोलट्री व्यवसाय व द्राक्ष पिकासाठी थंडी हानिकारक आहे.

गेल्या १५ दिवसांपासून थंडीपासून अंशत: दिलासा मिळाला होता. मात्र गुरूवार (ता. ७), शुक्रवार (ता. ८) पासून थंडीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. नागरिक पुन्हा शेकोटीकडे वळले आहेत. नारोडी येथे विजय पवार यांच्या कारवर तसेच आदर्शगाव गावडेवाडी येथील बापू निघोट यांच्या दुचाकीवर बर्फाचा थर साचला होता.

रात्री वाराही सुरु होता. त्यामुळे थंडीमध्ये भर पडली. नागरिक, महिला वर्ग, शालेय विद्यार्थी, बालगोपाल मफलर, स्वेटर, कानटोपी, बूट हातमोजे आदी उबदार कपड्यांचा वापर करतांना दिसत आहेत. थंडीचा परिणाम शालेय विद्यार्थी उपस्थितीवर जाणवू लागला आहे. विशेषतः अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी 
शनिवारी सकाळी शाळा असल्याने अनेकांनी दांडी मारल्याचे आढळून आले.

वाढत्या थंडीमुळे ऊस तोडणी कामगारांचे सर्वाधिक हाल होत असून याच रब्बी पिकांना थंडी पोषक ठरणार आहे. बटाटा, कांदा आणि फळवर्गीय पिकांना या थंडीचा फायदा होणार आहे. याशिवाय ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या वाढीसाठी हवामान पोषक आहे. 

द्राक्ष पिकासाठी मात्र थंडी हानिकारक आहे. असे तालुका कृषी अधिकारी संजय विश्वासराव यांनी सांगितले. आंबेगाव तालुक्यात १५० हून अधिक पोलट्रीचे व्यवसाय 
आहेत. थंडीचा फटका पक्षांना बसत आहे. पक्षांना उब मिळण्यासाठी इलेक्ट्रिक रूम हिटर व दगडी कोळशाच्या शेगड्या पेटविल्या  जात आहेत.

Web Title: Temperature falls drastically in ambegaon taluka