चैत्राच्या स्वागताला वैशाख वणवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

पुण्यात मार्चमधील दहा वर्षांमधील उच्चांकी तापमानाची नोंद

पुण्यात मार्चमधील दहा वर्षांमधील उच्चांकी तापमानाची नोंद
पुणे - फाल्गुनच्या अखेरीला व चैत्राच्या स्वागताला राज्यात वैशाख वणवा पेटावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भातील पश्‍चिम भागात काही ठिकाणी उष्णतेची लाट उसळली असून, निम्म्या महाराष्ट्रातील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशीच्या वर उसळी मारली असल्याचे भारतीय हवामान खात्याने सोमवारी नोंदविले. राज्यात अकोला येथे सर्वाधिक म्हणजे 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 39.9 अंश सेल्सिअस नोंदला गेला. शहरात मार्चमधील गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद सोमवारी झाली.

राज्यातील 19 शहरांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उसळी मारली आहे, त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पश्‍चिम विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (ता. 31) राज्यात कोरडे वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात उष्णता आणि दमटपणा तयार झाला आहे, त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत वाढ झाली आहे.

विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या संपूर्ण भागात, मध्य महाराष्ट्र व कोकण, गोव्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली, तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

परिणामी पुणे परिसरात बुधवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.

पुण्यात 30 मार्च 2007 रोजी 39.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर गेल्या नऊ वर्षांत दोनदा मार्चमधील कमाल तापमानाचा पारा 39.1 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता; पण सोमवारी गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शहरात दुपारी वाहनांची वर्दळ कमी झाली होती. शहरातील रस्त्यांवरील गर्दी ओसरली होती. तर, संध्याकाळीही गरम हवा वाहात होती. दुपारी सरबत, शीतपेये यांच्या गाड्यांवर गर्दी वाढल्याचे चित्र दिसत होते.

Web Title: temperature increase in pune