मोहोळ : टेम्पोची दुचाकीला धडक; एक ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

- दुचाकीला टेम्पोने पाठीमागून दिली धडक.

- अपघातात एक जण जागीच ठार. 

- सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरे फाट्याजवळ झाला अपघात.

मोहोळ : टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. हा अपघात सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरे फाट्याजवळ आज (रविवार) सकाळी आठ वाजता झाला. अमोल सज्जन बारबोले (वय 25 रा. हिवरे) असे मृताचे नाव आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमोल बारबोले हा मोटरसायकल क्रमांक एम. एच. 13 एई 9556 वरून क्रॉस रोडवरून मोहोळच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी पुण्याहून सोलापूरच्या दिशेने आयशर टेम्पो क्रमांक टी एस 12 युसी 2192 हा निघाला होता. दोन्ही वाहने हिवरे फाट्याजवळ येताच आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात अमोलचे डोके फुटून तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरात होती की, अपघात होताच अमोल दुचाकीसह बऱ्याच लांबपर्यंत फरफटत गेला.

दरम्यान, अपघात होताच नागरिक रस्त्यावर जमा झाले व सर्व्हिस रोडची मागणी करून गोंधळ घालू लागले. ही घटना समजताच पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व पोलिस उपनिरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळ गाठले व संतप्त नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

या घटनेची फिर्याद दीपक औदुंबर बारबोले (रा. हिवरे) यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास हवालदार नागप्पा निंबाळे करित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tempo Bike Accident in Mohol One killed