पुणे - दौंडमध्ये क्रीडा संकूल व नाट्यगृहासाठी दहा एकर जागा

प्रफुल्ल भंडारी
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

दौंड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड शहरातील कृषी विभागाची दहा एकर जागा नियोजित तालुका क्रीडा संकुल व अद्ययावत नाट्यगृहासाठी उपलब्ध करून देण्यासंबंधी निर्देश दिल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी दिली. 

दौंड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड शहरातील कृषी विभागाची दहा एकर जागा नियोजित तालुका क्रीडा संकुल व अद्ययावत नाट्यगृहासाठी उपलब्ध करून देण्यासंबंधी निर्देश दिल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी दिली. 

मुंबई येथे ३ एप्रिल रोजी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे निर्देश दिले. बैठकीस जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, दौंडचे आमदार राहुल कुल, नगराध्यक्षा शीतल कटारिया यांच्यासह कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हाधिकारी सौरभ राव, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक तानाजी चिखले, नगरसेवक प्रेमसुख कटारिया, नगपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी नियोजित तालुका क्रीडा संकुलासाठी दौंड शहरातील रेल्वे उड्डाण पुलाजवळील कृषी विभागाच्या बीज गुणन केंद्राची जागा देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. फडणवीस यांनी तातडीने तालुका क्रीडा संकुल व नाट्यगृहाचा प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ राव यांना बैठकीत दिले आहेत. कृषी विभाग सदर दहा एकर जागा नाममात्र एक रुपये भाडेतत्त्वावर दौंड नगरपालिकेला किंवा तालुका क्रीडा समितीला उपलब्ध करून देणार आहे. सदर जागेच्या बदल्यात दौंड कृषी विभागाला शेजारच्या गावातील पर्यायी जागा दिली जाणार आहे.

बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट यांनी नियोजित क्रीडा संकुलासाठी जिल्हा नियोजन समिती मधून मदत करण्याचे आश्वसन दिले आहे, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे दिली आहे. 

Web Title: Ten acres of land for sports complexes and theater in Daund