...अन् पुण्यातील गावात अचानक प्रकटले दहा बाऊंसर

...अन् पुण्यातील गावात अचानक प्रकटले दहा बाऊंसर

वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील शिरष्णे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणूकीदरम्यान आज चक्क दहा बाऊंसर आणले गेल्याने एकच खळबळ माजली होती. 

या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी रस्सीखेच होती. सकाळी सरपंचपदाच्या निवडणूकीच्या प्रक्रीयेच्या अगोदर तगड्या प्रकृतीचे दहा बाऊंसर्स अचानकच ग्रामपंचायतीबाहेर येऊन थांबल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. हे बाऊंसर नेमके कोणी आणले याचा खुलासा झालेला नसला तरी निवडणूकीच्या काळात अशी घटना दहशत निर्माण करणारी असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. 

बारामती तालुक्यात कोणत्याच निवडणूकीत आजपर्यंत बाऊंसर वापरण्याची प्रथा नव्हती. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत ही घटना घडल्याने याची मोठी चर्चा झाली. 

बाऊंसर आल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना कळविल्यानंतर काही वेळाने पोलिस त्या ठिकाणी पोहोचल्याचे सांगितले गेले. दरम्यान सरपंचपदाची निवडणूक पूर्वनियोजित होती व या ठिकाणी काहीसे तणावाचे वातावरण होते याची माहिती असूनही येथे एकही पोलिस उपस्थित नव्हता, हा पोलिस विभागाचा हलगर्जीपणा होता अशी भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

बारामती तालुका सामाजिकदृष्टया शांतता असलेला तालुका म्हणून प्रसिध्द आहे, बाऊंसर वापरण्याची पध्दत आजपर्यंत कधीच येथे नव्हती, ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान जर बाऊंसर वापरले जात असतील तर ही पध्दत दहशत निर्माण करणारी असून ती पोलिसांनी मोडीत काढायला हवी अशी ग्रामस्थांची मागणी होती. 

दरम्यान ही निवडणूकच दबावाखाली झाल्याचा आरोप निवडणूक निर्णय अधिका-यांकडे लेखी आक्षेप घेऊन केला गेला, मात्र निवडणूक निर्णय अधिका-यांनी निवडणूक प्रक्रिया रद्द करता येणार नाही असे कारण देत यबाबतचा अर्ज निकाली काढला. 

पोलिसांचीही अनास्था...
बाऊंसर आल्याचे समजल्यानंतर संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यासह विनामास्कची कारवाई करणे अपेक्षित असताना पोलिसांनीही बघ्याचीच भूमिका घेतल्याने ग्रामस्थ संतापले होते. पोलिसांचा धाक राहिलाय की नाही अशीच स्थिती असल्याचे अनेकांनी सांगितले. पोलिस यंत्रणा सक्षम असेल तर बाऊंसरची गरजच काय असा प्रश्न उपस्थित केला गेला. 

विनामास्कचे बाऊंसर....
कोरोनाचे संकट घोंघावत असताना या ठिकाणी असलेले सगळेच बाऊंसर विनामास्क फिरत होते आणि त्यांच्यावर कोणीही कसलीही कारवाई करण्यासाठी धजावले नाही. शेवटपर्यंत ते विनामास्कच वापरल्याचे फोटोतून पुढे आले आहे. 

पोलिस कारवाई करणार...
या संदर्भात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबत माहिती घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करीत आहोत, संबंधिताना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले असल्याचे सांगितले. 

(संपादन : सागरडी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com