खडकवासला गोळीबार प्रकरणातील 'तो' कुख्यात गुंड अटक 

arre.jpg
arre.jpg

किरकटवाडी : रविवार 17 मे रोजी घडलेल्या खडकवासला गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुन्हेगार चेतन लीमन व त्याच्या इतर दहा साथीदारांना अटक करण्यात हवेली पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

दरम्यान, सराईत गुन्हेगार चेतन लीमन याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, बेकायदा जमाव जमवणे, दहशत पसरवणे, मारहाण, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे अशा गंभीर स्वरूपाच्या दहा गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या तीन वर्षांपासून चेतन लिमन वेगवेगळ्या ठिकाणी लपून गुन्हेगारी कृत्य करत होता.

17 मे रोजी खडकवासला येथील अवैध व्यवसायिक राजू सोनवणे याच्या घरावर चेतन लीमनच्या साथीदारांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये खंडु चव्‍हाण या तरुणाच्या डोक्यामध्ये गोळी लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली व हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील यांना दररोज तपासाचा आढावा घेण्यास सांगण्यात आले. हवेली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी वेगवेगळी पथके तयार करून गुन्हेगारांचा तपास सुरू केला. खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि मोबाईल लोकेशन यावरून मुख्य आरोपी चेतन गोविंद लीमन (वय 28, किरकटवाडी), किरण महेंद्र सोनवणे (वय 20, किरकटवाडी), दिगंबर दीपक चव्हाण (वय23, किरकटवाडी), कुमार दराप्पा होनमोरे( वय 20, किरकटवाडी), सौरभ सतीशकुमार छनियाना(वय20, किरकटवाडी), ऋतिक विजय सोनवणे ( वय 20, किरकटवाडी), तुषार हनुमंत भंडलकर ( वय 26, धायरीगाव), ओंकार सुरेश घुले (वय 20, नांदोशी), उदय महेंद्र सोनवणे ( वय 20, किरकटवाडी), अजय प्रकाश औरादकर (वय 20, किरकटवाडी) यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक करण्यात आली असून हवेली पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे.

हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार संजय शेंडगे, पोलीस नाईक रवींद्र नागटीळक, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कोळेकर, पोलीस नाईक रामदास बाबर, पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत सोनवणे,संतोष भापकर, गणेश धनवे ,अभिमन्यू धुमाळ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस निरीक्षक अमोल गोरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस नाईक राजू मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेडगे, मंगेश भगत बाळासाहेब खडके शब्बीर पठाण, पोलीस नाईक विजय कांचन चंद्रकांत जाधव लियाकत मुजावर, समाधान नाईकनवरे, सहाय्यक फौजदार दिलीप जाधवर या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कित्येक दिवसांपासून फरार असलेल्या व मोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लीमन टोळीला पकडण्याची कामगिरी पार पाडली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना उद्या कोर्टात हजर केले जाणार असून विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्याकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com