शिरूरकरांनीही निर्णय घेतला...शनिवारपासून दहा दिवसांचा लॉकडाउन

lock down
lock down

शिरूर (पुणे) : शिरूर शहर व परिसरातील कोरोनाची व्याप्ती झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात शनिवारपासून (ता. १८) संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुकारलेला हा दहा दिवसांचा लॉकडाउन शनिवारी सायंकाळपासून सुरू होईल.

शिरूर शहरात काल एका दिवसात १५ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले़; तर आज शहराच्या मध्यवस्तीतील दोघे बाधित आढळले. शहरापासून लगतच सरदवाडी येथे दोघे; तर रामलिंग रोडवरील जाधव मळ्यातही दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. गेल्या आठवडाभरात शहर व परिसरातील कोरोनाची व्याप्ती झपाट्याने वाढली असून, आठ दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या तीसहून अधिक झाल्याने आज अखेर शहरात दहा दिवसांचा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

१८ ते २८ जुलै या काळातील या लॉकडाउनची घोषणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आज केली. प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे तसेच आमदार अशोक पवार, नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्याशी काल दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा करून शहर व परिसरातील कोरोनाची स्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, शहरातील विविध संस्था- संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी व इतर घटकांशीही स्वतंत्रपणे चर्चा करून सर्वानुमते लॉकडाउनचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिरूर शहरातील दहा प्रभागांपैकी पाच प्रभागात कोरोनाचे रूग्ण आढळले असून, सद्यस्थितीत शहरातील तीन प्रभागांत प्रतिबंधित क्षेत्र जाहिर केलेले आहे. मात्र, कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चालल्याने संपूर्ण शहरातच लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व मेडिकल वगळता कुठल्याही अस्थापनांना लॉक़डाउनमधून सवलत नसल्याचे रोकडे यांनी स्पष्ट केले. किराणा मालाच्या दुकानांनाही वेळेची मर्यादा आखून दिली असून, शहरातील कोरोनाची साखळी कायमस्वरूपी तुटण्यासाठी शिरूरकर नागरीकांनी या लॉकडाऊनचे काटेकोर पालन करावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास किंवा शासकीय नियमांचा भंग केल्यास कठोरातील कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.  
    
कोरोनाचे आणखी 11 रुग्ण
आज तालुक्यातील कोरेगाव भीमा, गणेगाव खालसा, सणसवाडी, शिक्रापूर व बाभुळसर खुर्द येथील प्रत्येकी एकाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली. शहरासह तालुक्यातील एकूण बाधितांची दिवसभरातील संख्या ११ असून, काही बाधितांच्या संपर्कातील २५ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचा रिपोर्ट उद्या येणार असल्याने त्याकडेही शिरूरकरांचे डोळे लागले आहेत. 
 
Edited By : Nilesh J shende
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com