पार्किंगसाठी दहा मजली इमारत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

संरक्षण मंत्रालयाची मंजुरी; २८० चारचाकी लावता येणार

पुणे - पुणे कॅंटोन्मेंटमधील महात्मा गांधी रस्ता (एमजी रोड) व ईस्ट स्ट्रीट रस्त्यावर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना वर्षानुवर्षे भेडसावणारा चारचाकी पार्किंगचा प्रश्‍न आता सुटणार आहे. त्यासाठी कॅंटोन्मेंट प्रशासन लवकरच वाहने पार्किंग करण्यासाठी दहा मजली इमारत उभारणार आहे. त्याला संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त पार्किंगमध्ये एकावेळी २८० चारचाकी वाहने लावता येणार आहेत. पार्किंगचा प्रश्‍न सुटणार असल्यामुळे ‘एमजी रोड’वर हौसेने येणाऱ्यांना खरेदीचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.

लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्ता, ईस्ट स्ट्रीट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता यासह अंतर्गत रस्त्यांवर चारचाकी वाहने लावण्यासाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नाही. त्यामुळे काही रस्त्यांवर चारचाकी वाहनांची समांतर पार्किंग होत असल्याची सद्यःस्थिती आहे. ही बाब लक्षात घेऊन कॅंटोन्मेंटने बहुमजली पार्किंगचा प्रस्ताव तयार करून तो संरक्षण मंत्रालयाला पाठविला होता. अनेक तांत्रिक अडचणी पार केल्यानंतर आणि कॅंटोन्मेंटचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, मालमत्ता विभागाच्या संचालक गीता कश्‍यप यांनी पाठपुरावा केला. बोर्डाने सुचविलेल्या एका जागेवर दहा मजली पार्किंग करण्यास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली. दुसऱ्या बहुमजली पार्किंगसाठी नवीन जागेचा शोध घेण्याची सूचना केली आहे. 

याबाबत बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड म्हणाले, ‘‘जनरल थिमय्या रस्त्यावरील बॉम्बे गॅरेजशेजारील जागा आणि हॉटेल मंगल विहारसमोरील जागेवर पार्किंगची इमारत उभारण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठविला होता. त्यापैकी बॉम्बे गॅरेजशेजारी जागेसाठी मान्यता मिळाली. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर दहा मजली पार्किंग तयार होईल. त्यासाठी १७ कोटी रुपये खर्च येणार आहे.’’ 

लष्कर भागात एमजी रोड व ईस्ट िस्ट्रट हे प्रमुख रस्ते आहेत; परंतु चारचाकी वाहनांसाठी पुरेसे पार्किंग नाही. त्याचा आर्थिक फटका बसतो. म्हणूनच आम्ही पार्किंगची सुविधा देण्याची मागणी कॅंटोन्मेंटला केली होती. त्यानुसार दहा मजली पार्किंग होणार आहे. त्याचा ग्राहकांबरोबरच व्यावसायिकांनाही फायदा होईल.
- सचिन सिंग, उपाध्यक्ष, पुणे कॅम्प मर्चंट्‌स असोसिएशन

Web Title: ten floor building for parking