आमची दहा किलोमीटरची पायपीट थांबेल काय?

आमची दहा किलोमीटरची पायपीट थांबेल काय?

टाकवे बुद्रुक  - गावात ना एसटी बस फिरकते...ना खासगी वाहनाची सोय...त्यामुळे दररोज खड्डे, चिखल, शेतीचे बांध तुडवत पाच किलोमीटर पायी तुडवीत आंदर मावळच्या पूर्व भागातील ठाकरवाडीतील मुले-मुली शाळेत जातात. अठरा पगड दारिद्य्र, पूर्वापार चालत आलेली निरक्षरता आणि प्रतिकूलता अशी आव्हाने स्वीकारत हे बालचमू कुटुंबात शिक्षणरूपी ज्योत पेटवू पाहात आहेत. नवलाख उंब्रेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते घर अशी दररोज दहा किलोमीटरची पायपीट ते करत आहेत. 

मिंडेवाडीजवळील ठाकरवस्तीमध्ये अनेक वर्षांपासून हे आदिवासी स्थायिक झाले आहेत. अनेक पिढ्यांची साधी अक्षर ओळखही झाली नाही. त्याचे अनेक परिणाम त्यांना सोसावे लागले. दैनंदिन जीवनात अनेक व्यावहारिक अडचणी आल्या. अनेकदा फसगतही झाली. त्यातूनच त्यांना शिक्षणाचे मोल कळले. आपण नाही, पण लेकरांनी चार बुके शिकली पाहिजे, ही भावना त्यांच्यामध्ये बळावली. दरम्यान, शासनानेही शिक्षण हक्क कायदा काढला. त्याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यातून वाड्या-वस्त्यांवर शिक्षणाची गंगा पोचली. पण, तुलनेने भौतिक सुविधा निर्माण झाल्या नाहीत. 

किमान मूलभूत सुविधा उपलब्ध होऊन आमच्या लेकरांची पायपीट थांबेल का?, असा प्रश्‍न हे आदिवासी बांधव विचारत आहेत. छकुली खंडागळे, शारदा भांगरे, ज्योती भांगरे, धनश्री भांगरे, कल्पना भांगरे, अर्चना भांगरे, वैशाली भांगरे या चिमुरड्यांनीही केवळ एवढीच अपेक्षा व्यक्त केली आहे.

अलीकडे स्कूल व्हॅन, पलीकडे पायपीट
ठाकरवाडीत पन्नास घरे आहेत. शेदोनशे लोकसंख्या असलेल्या या वस्तीतील २५ मुले-मुली शिक्षण घेत आहेत. त्यात मुलींची संख्या अधिक आहे. पालकांनी या मुलांची सोय शासकीय आश्रमशाळेत केली आहे. मात्र, मुली वस्तीत राहूनच शिक्षण घेत आहेत. त्याबरोबर मैलोनमैल पायपीटही करत आहेत. वस्तीजवळील बधालेवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी, नवलाखउंब्रेतील मुले-मुली महागड्या इंग्रजी शाळेत स्कूल बस, स्कूल व्हॅनमधून जातात. याच गावाच्या पलीकडे नजर मारल्यास पायपीट करत, चिखल तुडवत जाणारी लेकरे दिसतात. हा विरोधाभास पाहिल्यानंतर असमान विकास डोळ्यात भरतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com