esakal | 'रॉ'ची भिती दाखवित तरुणीकडून उकळले दहा लाख रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

'रॉ'ची भिती दाखवित तरुणीकडून उकळले दहा लाख रुपये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - अमेरीकन तपास संस्थेचा अधिकारी असल्याची तरुणीला (Girl) बतावणी करून एकाने तिच्यावर भारतातील रिसर्च ऍन्ड ऍनलिसीस विंग (रॉ) (Raw) या तपास संस्थेची नजर असल्याची भिती दाखविली. त्यानंतर तरुणीकडून लॅपटॉपसह 10 लाख रुपयांची रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, चतुःशृंगी पोलिसांनी (Police) आरोपीस तत्काळ बेड्या ठोकल्या. (Ten Lakh Rupees Cheating from a Young Woman who was Scared of Raw)

अमित अप्पासाहेब चव्हाण ( वय 30, रा.एमआयडीसी, बारामती) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी धनश्री हासे (वय 28) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एप्रिल ते 7 जुलै दरम्यान हि घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हासे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांची काही दिवसांपुर्वी आरोपी अमित समवेत "बेटर हाफ' सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. त्यावेळी आरोपीने त्याचे नाव राहूल पाटील असे असल्याचे सांगून तो अमेरीकेत इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगितले. दुबई, अमेरिका व भारत त्याच्या देखरेखीखाली असल्याची त्याने बतावणी केली.

हेही वाचा: HCMTR मार्गावर नियो मेट्रो करा; देवेंद्र फडणवीस यांची सूचना

'आम्ही भारतामध्ये तपासासाठी आलो आहोत, तुझ्यावर "रॉ' ची नजर आहे'' अशी भीती त्याने धनश्रीला दाखविली. त्यानंतर तरुणीशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवित अमितने तिच्याकडील मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती नष्ट करण्यास सांगून तिच्याकडून वेळोवेळी रक्कम ऑनलाईन घेतली. त्यामध्ये 8 लाख 37 हजार रुपयांची रोकड व एक लाख 28 हजार रुपयांचा लॅपटॉप असा एकूण 9 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज नेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास करून याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सायबर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामध्ये तरुणीची फसवणूक करणारा व्यक्ती हा बारातमी येथील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी या प्रकरणातील आरोपी तत्काळ अटक करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सायबर पोलिस बारामतीमध्ये दाखल झाले, मात्र आरोपीने नाव बदलेले असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांना जिकीरीची जात होते. त्याचे खरे नाव निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डि.एस.हाके, पोलिस उपनिरीक्षक रुपाली पवार, पोलिस कर्मचारी किरण जमदाडे, शिरीष गावडे, अनिल पुंडलीक, राणी काळे यांच्या पथकाने आरोपीस बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे करीत आहेत.

अन्‌ आरोपीला सासुरवाडुतनच उचलले !

आरोपी अमित चव्हाण हा वॉटर फिल्टर टेक्‍नीशीअन आहे. त्याने याच पद्धतीचे तीन ते चार गुन्हे केले आहेत.आरोपी त्याच्या सासुरवाडीत राहात होता. पोलिसांनी सासुरवाडीतुनच त्याला ताब्यात घेतले.

loading image