दहा महिन्यांच्या बाळाला वाचविले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

 मित्रमंडळ चौकातील एका बंगल्यातून अग्निशमन दलाच्या जवानांनी चौघांसह दहा महिन्यांच्या बाळाची बुधवारी रात्री सुटका केली.

पुणे - मित्रमंडळ चौकातील एका बंगल्यातून अग्निशमन दलाच्या जवानांनी चौघांसह दहा महिन्यांच्या बाळाची बुधवारी रात्री सुटका केली. त्यामुळे जवानांवर टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात कौतुकाचा वर्षाव झाला.

पद्मावती परिसरातील घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या बचावासाठी अग्निशमन दलाची गाडी जात होती. तेव्हा मित्रमंडळ चौकातील बंगल्यात नागरिकांच्या ओरडण्याचा आवाज आला. ही माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविली होती.

जवान मारुती देवकुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी घरात आजी घाबरलेल्या अवस्थेत स्टूलवर उभ्या होत्या. देवकुळे यांनी त्यांना धीर दिला.

घरातील प्रमोद मोरेश्‍वर नातू (वय ७२), सरिता प्रमोद नातू (वय ६४), मयूरेश प्रमोद नातू (वय ३६), मंजिरी मयूरेश नातू (वय ३०) यांच्यासह राजस मयूरेश नातू (वय १० महिने) हा परिवार होता. देवकुळे यांनी आजी-आजोबा व अन्य सदस्यांना दोरीच्या साहाय्याने बाहेर आणले. तर, दहा महिन्यांच्या राजसला टबमधून अलगदपणे बाहेर आणले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten months baby saved

टॅग्स