इंदापूर तालुक्यात खळबळ, या गावात आढळले कोरोनाचे दहा रुग्ण 

प्रा. प्रशांत चवरे
Thursday, 16 July 2020

इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रवास आता शहरामधून ग्रामीण भागामध्ये वेगाने होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यातील अकोले येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कातील ९ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. कोरोनाचा धसका घेतलेल्या ग्रामस्थांनी प्रवेशबंदी, संपर्कातील लोकांचे विलगीकरण केले आहे, तर प्रशासनाच्या वतीने गाव सील करण्यात आले आहे. 

असा चेक करा बारावीचा रिझल्ट

अकोले गावाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रवास आता शहरामधून ग्रामीण भागामध्ये वेगाने होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अकोले येथील एक महिला सोमवारी (ता. १३) कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तिच्या संपर्कातील २१ व्यक्तींचे घशातील द्राव इंदापूर येथे तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल बुधवारी (ता. १५) रात्री उशिरा मिळाला. त्यामध्ये २१ पैकी ९ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

आईने सांगितला तसा अभ्यास केला आणि बोर्डाच्या परीक्षेत पहिला आला

अकोलेसारख्या छोट्या गावामध्ये दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे व प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या कुटुंबाचे मेडिकल दुकान आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अकोले गाव सील केले असून, ग्रामस्थांच्या वतीने गावबंदी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन गावातील लोकांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. आशा सेविका, आरोग्य सेविका, प्राथमिक शिक्षक यांच्या माध्यमातून गावातील लोकांचे सर्व्हेक्षण सुरु करण्यात येत आहे. गावातील लोकांनी घाबरुन न जाता सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Edited By : Nilesh J shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten patients of Corona were found in this village in Indapur taluka