पुणेकरांनो, आता ‘निवासीं’ना करात फक्त दहा टक्‍केच सवलत

पुणेकरांनो, आता ‘निवासीं’ना करात फक्त दहा टक्‍केच सवलत

पुणे- मिळकत करावर दिली जाणारी चाळीस टक्के सवलत रद्द करण्याचा आणि देखभाल दुरुस्तीच्या सवलतीमध्ये पाच टक्‍क्‍यांनी कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरात नव्याने बांधलेल्या, तसेच २०११ नंतरच्या निवासी सदनिकांच्या मिळकत करात सरसकट ४५ टक्‍के वाढ होणार आहे. तसेच येथून पुढे मिळकतदारांना केवळ १० टक्केच सवलत मिळणार आहे.

१२ जुलै १९६१ मध्ये पानशेत धरण फुटले. त्या पुरामध्ये संपूर्ण पुणे शहराची वाताहत झाली. अनेक घरांचे अतोनात नुकसान झाले. पुणेकरांना दिलासा देण्यासाठी १९७०-७१ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निवासी मिळकतीच्या मिळकत करामध्ये ४० टक्के सवलत देण्याचा ठराव मान्य केला. कायद्यातील तरतुदीनुसार जागा मालकाला १० टक्केऐवजी १५ टक्के देखभाल दुरुस्तीसाठी सवलत देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून स्वत: मालक रहात असले, तर त्यांना अशा प्रकारे ५५ टक्के सवलत करआकारणी करताना दिली जात होती.

पानशेत धरणफुटीला नुकतीच ५८ वर्षे पूर्ण झाली. असे असताना राज्य सरकारने पुणेकरांना मिळकत करातील ४० टक्‍के सवलत काढून टाकण्याचे, तसेच देखभाल दुरुस्तीची सवलत १५ ऐवजी १० टक्केच देण्याचे आदेश पुणे महापालिकेला दिले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांची अंमलबजावणी पूर्वलक्षीप्रभावाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे २०११ नंतर ज्या नागरिकांनी सदनिका घेतल्या आहे. त्यांना ही सवलत दिली आहे. त्या मिळकतदारांकडून दिलेली सवलत वसूल केली जाणार आहे. ही सवलत महापालिका टप्प्याटप्प्याने वसूल करणार की एक रकमी वसूल करणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे. 

मिळकत कर कसा वाढणार?
कर आकारणी करण्यासाठी प्रती चौरस फुटाचे दर निश्‍चित करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. सध्या हा दर एक रुपया आहे, असे समजले, तर पाचशे चौरस फुटांच्या सदनिकेला किती मिळकतकर बसणार यांचे हे उदाहरण : प्रती चौरस फूट एक रुपया गुणिले ५०० चौरस फूट (सदनिकेचे क्षेत्रफळ) गुणिले बारा महिने केल्यानंतर सहा हजार रुपये ही तुमची वार्षिक करपात्र रक्कम (एआरव्ही) निश्‍चित केली जाते. त्यावर मालक स्वत: राहत असल्यामुळे त्या सहा हजार रुपयांच्या वार्षिक करपात्र रकमेवर ४० टक्के सवलत दिली जात असे. ही सवलत मिळाल्यानंतर वार्षिक करपात्र रक्कम ३६०० निश्‍चित करून त्यावर १५ टक्के देखभाल दुरुस्तीची सवलत वजा करण्यात येते. या सवलती मिळाल्यानंतर जी रकम राहते म्हणजे ३ हजार ६० रुपये ही वार्षिक करपात्र रक्कम ग्राह्य धरून त्यावर कमीत कमी ३८.७५ टक्के कर (सर्वसाधारण करासह विविध) आकारणी केली जाते. आता वार्षिक करपात्र रकमेवर जी ४० टक्के सवलत मिळत होती ती आणि देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात येणाऱ्या सवलतीमध्ये पाच टक्‍क्‍यांनी कपात अशी ४५ टक्के कपात रद्द केली आहे. परिणामी पाचशे चौरस फुटांसाठी सहा हजार रुपये जी वार्षिक करपात्र रक्कम येत होती. त्यामध्ये आता केवळ दहा टक्‍क्‍यांनी सवलत मिळणार आहे. म्हणजे आतापर्यंत ३ हजार ६० रुपये वार्षिक करपात्र रक्कम ग्राह्य धरून कर आकरणी केली जात होती. ती आता ५ हजार ४०० रुपये वार्षिक करपात्र रकम ग्राह्य धरून त्यावर कमीत कमी ३८.७५ टक्के कर आकारला जाणार आहे.

गेली अनेक वर्षे सुरू असलेली ही सवलत एकदम काढून न घेता टप्प्याटप्प्याने काढून घेणे अपेक्षित होते. या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. पुणेकरांना दिलासा देण्यासाठी वार्षिक करपात्र रकम ठरविण्याचे जे दर आहेत. ते दर आता कमी करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न करावा.
- सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, नागरी हक्क संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com