दहा रुपयांच्या मनिऑर्डरने वाढविली उमेद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. भारत वाटवानी यांना या वेळचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केलेल्या भावना... 
डॉ. भारत वाटवानी, श्रद्धा रिहॅबिलिटेशन  फाउंडेशनचे संस्थापक

रस्त्यावरील मनोरुग्णांसाठी कर्जतमध्ये काम सुरू करून १०-११ वर्षे झाली होती. दोन खोल्यांच्या रुग्णालयातून सुरू झालेला प्रवास विस्तारत होता. त्या वेळी १९९९मध्ये ‘सकाळ’मध्ये आलेल्या लेखानंतर अनेक विद्यार्थ्यांनी दहा-दहा रुपयांची मनिऑर्डर मला करून मदत पाठविली होती. ही मदत संस्थेच्या उभारणीत मोलाची ठरली. त्याहीपेक्षा विद्यार्थ्यांनी दिलेल्या शुभेच्छा प्रोत्साहन देणाऱ्या ठरल्या.

मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ‘सकाळ’ने केलेला अभिनंदनाचा दूरध्वनी आल्यानंतर वीस वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. 

मनोरुग्णांसाठी १९८८मध्येच काम सुरू केले होते. हे काम करत असताना एक घटना घडली - रस्त्यावर उभ्या असणाऱ्या एका मनोरुग्णाने नारळ उचलला अन्‌ पळत-पळत दूर निघून गेला. त्याचा पाठलाग केला असता, जवळच्या गटारातील पाणी पिताना तो दिसला. मनोरुग्णाची ही अवस्था पाहून मन विचलित झाले आणि त्याला क्‍लिनिकमध्ये आणले आणि त्याच्यावर उपचार सुरू केला. तेव्हापासूनच रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांसाठी काम करण्याचे ठरविले. गेली तीन दशके अशा प्रकारच्या रुग्णांवर संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहोत. मात्र, अद्यापही समाज आणि सरकार म्हणावे तितक्‍या संवेदनशीलतेने रस्त्यावरील मनोरुग्णांकडे पाहत नाही, याची खंत वाटते. या कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा नावाजलेला पुरस्कार मिळाल्याने समाज आणि सरकार किमान आता तरी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देईल. या पुरस्काराने रस्त्यातील मनोरुग्णांकडे आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी अपेक्षा आहे. 

सुमारे चार लाख मनोरुग्ण देशातील रस्त्यावर आढळत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. यातील बहुतांश मनोरुग्ण हे सुशिक्षित असतात. आजपर्यंत सात हजारांहून अधिक मनोरुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात यश आले, याचे समाधान आहे.

मनोरुग्ण वाढण्याची काही कारणे... 
विभक्त कुटुंब पद्धती, नैराश्‍य 
मेंदूतील रासायनिक गुंतागुंतीचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो 
मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये जवळपास प्रत्येकी ५०० हून अधिक मनोरुग्ण रस्त्यावर आढळतात 

(शब्दांकन -मीनाक्षी गुरव) 

Web Title: Ten rupees of a money order