भाडेकरूंना तारण लागणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

मिळकत भाडेतत्त्वावर घेणाऱ्यांसाठी महापालिकेचा प्रस्ताव

पुणे - महापालिकेच्या मालकीची व्यावसायिक मिळकत भाडेतत्त्वावर घेण्यासाठी संबंधितांना तेवढ्याच किमतीची स्वत:ची मिळकत महापालिकेकडे तारण ठेवावी लागणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर येत्या दोन महिन्यांत हा निर्णय अमलात येईल. व्यावसायिक मिळकतींचे भाडे थकविण्याच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.   

या संदर्भात काही महिन्यांपूर्वी प्रस्ताव तयार केला असून, त्यात काही बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार महापालिका आणि भाडेकरू यांच्यात अधिकृत करार होईल. तसेच, भाडे थकविल्यास संबंधित भाडेकरूची मिळकत जप्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे, असे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

शहरात महापालिकेच्या निवासी आणि व्यावसायिक मिळकती असून, त्यांची संख्या साधारणत: १२ हजार इतकी आहे. त्या ठराविक मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येतात. त्यासाठी करारही करण्यात येतो. मात्र, भाडेकरू मिळकतीचे भाडे वेळेत भरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार नोटिसा देऊन भाडेवसुली होत नाही. तसेच, व्यावसायिक मिळकतींमधील भाडेकरूंनी महापालिकेला कोणतीही कल्पना न देताच, आपला व्यवसाय बंद केला आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.

भाडेकरूंकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या पार्श्‍वभूमीवर भाडेतत्त्वावरील मिळकतींसाठी नवीन नियमावली करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने केला आहे.

‘‘ज्या भाडेकरूंकडे थकबाकी आहे, त्यांना नोटिसा दिल्या जातात. मात्र, तरीही वेळेत भाडे भरले जात नाही. त्यामुळे नवी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार भाडे थकविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भाडे न भरणाऱ्यांच्या मिळकतींना टाळे ठोकण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल,’’ असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव 
महापालिकेच्या अनेक मिळकतींमधील भाडेकरूंना राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने ते मनमानी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाडेकरूंच्या दुकानांना टाळे ठोकण्याच्या कारवाईची नोटीस येताच, महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कारवाई टळत असल्याने काही भाडेकरू भाडे भरत नसल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर नव्या नियमावलीनुसार प्रभावी धोरण आखले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The tenants will have salvation