शिवसेनेचा 'युतीधर्म' लक्षात ठेवू - भाजप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

पुणे - विधान परिषदेच्या निवडणुकीत पुण्यातील भारतीय जनता पक्षाला मतदान करून शिवसेनेने युतीधर्म पाळला आहे, असे सेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी म्हटले आहे. तर, या निवडणुकीतील मतदान लक्षात घेऊन आम्ही पुढील वाटचाल करू, असे भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांनी म्हटले आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पुण्यातील उमेदवार अशोक येनपुरे यांना शिवसेनेची अपेक्षित सर्व मते मिळाली नाहीत, अशी चर्चा आहे. शिवसेनेची 74 तर भाजपची 62 मते असल्यामुळे येनपुरे यांना 136 मते मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात येनपुरे यांना 133 मते मिळाली आहेत. यात जिल्ह्यातील काही नगरपालिका सदस्यांची मतेही समाविष्ट असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर निम्हण यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, 'भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचा आम्हाला आदेश होता. त्यानुसार आम्ही मतदान केले आहे. शिवसेनेने युतीधर्म पाळला आहे. भाजपला अपेक्षेपेक्षा मते कमी का मिळाली, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे.''

याबाबत बिडकर म्हणाले, 'या निवडणुकीतील मतदानाची माहिती आम्ही घेत आहोत. मिळालेल्या मतांवरून काही बाबी उघड होत आहेत. त्याचा धडा घेऊन पक्ष पुढील वाटचाल करेल.'

Web Title: tensions in Shiv Sena - BJP relation after Vidhan Parishad elections