मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंदच, पण कोरोनाची भीती कायम

सावता नवले
Tuesday, 24 November 2020

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नियम पाळण्याचे दडपण विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होते.        

कुरकुंभ (ता. दौंड, जि. पुणे) : कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या आठ महिन्यांपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांची पावले सोमवारी (ता. 23) येथील फिरंगाईमाता विद्यालयाकडे वळाले. त्यामुळे विद्यालयाचा परिसर फुलून गेला. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नियम पाळण्याचे दडपण विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होते.        

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सरकारच्या आदेशानुसार, कुरकुंभ येथील फिरंगाईमाता विद्यालयाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून नववी ते बारावीचे वर्ग सोमवारी चालू केले. आठ महिन्यांच्या विलंबानंतर विद्यार्थी मित्र-मैत्रिणी भेटल्याने चेहऱ्यावरून आनंद दिसत होता. परंतु, कोरोनामुळे निर्माण झालेले भीतीचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये जाणवत होते. हस्तांदोलन न करणे, मास्क लावणे, अंतर ठेवून बसणे इत्यादी नवीन बदल विद्यार्थ्यांमध्ये दिसून आले.

कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन समितीतर्फे सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षकांना मास्क लावण्याची सक्ती, वर्गात प्रवेश करताना व बाकावर बसताना अंतर ठेवून बसणे, एका बाकावर एकच विद्यार्थी बसविणे, वर्ग खोल्या सॅनिटायझ करण्यात आल्या. विध्यार्थी संख्या जास्त असल्याने विद्यालयाने नववी व दहावीचे वर्ग सकाळी 8 ते 11 या वेळेत, तर अकरावी बारावीचे वर्ग दुपारी 12 ते 3 यावेळेत भरविण्यात येणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतिपत्र घेण्यात आले आहे. विद्यालयातील शिक्षकांची कोरोना तपासणी करून घेतली आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फार फायदा झाला नसल्याचे दिसून येत असून शासनाकडून शाळा सुरू करण्याबाबत घाई होत असल्याचे मत विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब भापकर यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tenth and twelth schools starts but have corona fears