ठाकरे रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर कधी?

ठाकरे रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर कधी?

पौड रस्ता - कर्वेनगरमधील महापालिकेच्या बिंदू माधव ठाकरे दवाखान्याची सहा मजली इमारत धूळ खात पडली आहे. यातील पहिल्या मजल्यावर ओपीडी सुरू असून उर्वरित मजले मात्र, गेल्या आठ वर्षांपासून बंद आहेत.

कोथरूड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने डिसेंबर २०११ रोजी गोसावी वस्तीजवळ बिंदू माधव ठाकरे रुग्णालय उभारण्यात आले. येथे दररोज १००-२०० रुग्ण उपचारासाठी येत असतात. येथील पहिल्या मजल्यावर ओपीडी सुरू आहे, तर उर्वरित पाच मजले आठ वर्षांपासून रिकामे आहेत. या रुग्णालयात कर्मचारी व विविध सुविधांचा अभाव आहे. नुकताच इमारतीच्या उर्वरित मजल्यांवर जन्मजात कर्णबधिर बालकांचे बहुआयामी अपंग पुनर्वसन व सर्वांगीण विकास केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. येथे कर्णबधिरांसाठी होत असलेले केंद्र स्वागतार्हच आहे. मात्र, चार मजले एकाच उद्देशासाठी देण्याऐवजी यातील एक मजला रक्तपेढी, ऑर्थोपेडिक्‍स आदी कारणासाठी दिला तर ते जास्त योग्य होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. कोथरूड परिसरात महापालिकेची रक्तपेढी, व्यसनमुक्ती केंद्र, ऑर्थोपेडिक्‍स, नेत्र व दंत तपासणी केंद्राचा अभाव आहे. या परिसरातील नागरिकांमध्ये व्यसनाचे प्रमाण जास्त आहे. तसेच खासगी रुग्णालयातील रक्ताच्या किमती व इतर उपचारासाठी भरावे लागणारे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्या अनुषंगाने येथील जागेचा वापर झाल्यास तो योग्य होईल असे मत नागरिक अनिता चव्हाण यांनी व्यक्त केले.

या रुग्णालयातील इमारतीचे उर्वरित मजले कर्णबधिरांच्या उपचारासाठी देण्याचा प्रस्ताव आहे. रक्तपेढी तसेच इतर कारणांसाठीसुद्धा या जागेतील काही मजले मागण्यात आले आहेत. स्थायी समितीमध्ये या संदर्भात जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल. 
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य अधिकारी पुणे महापालिका

माझ्या चुलत भावाला तीन बाटल्या रक्ताची गरज होती. रक्तघेण्यासाठी मला नवी पेठेत यावे लागले. उपनगरात रुग्णालयांची संख्या जास्त आहे. तेथे जेव्हा रक्ताची गरज भासते, तेव्हा शहरात यावे लागते. त्यामुळे या रुग्णालयात रक्तपेढी होणे गरजेचे आहे. तसेच येथे पालिकेचे व्यसनमुक्ती केंद्र, नेत्र व दंत तपासणी केंद्र सुरू झाल्यास नागरिकांचा फायदा होईल.  
- रोहित माझीरे, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com