ठाकरे रुग्णालयात अखेर सुविधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

रामवाडी - वडगाव शेरीतील महापालिकेच्या मातोश्री मीनाताई बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या सुविधा फक्त फलकावरच अशी स्थिती होती; मात्र ‘सकाळ’मध्ये या असुविधांबाबत वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. आता तेथे डॉक्‍टर, टेक्‍निशियन आणि आवश्‍यक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. 

रामवाडी - वडगाव शेरीतील महापालिकेच्या मातोश्री मीनाताई बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या सुविधा फक्त फलकावरच अशी स्थिती होती; मात्र ‘सकाळ’मध्ये या असुविधांबाबत वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. आता तेथे डॉक्‍टर, टेक्‍निशियन आणि आवश्‍यक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. 

महापालिकेने २०१६ मध्ये या रुग्णालयाची उभारणी केली होती; मात्र गेल्या काही महिन्यांपासून या रुग्णालयाच्या सुविधा फक्त फलकावरच होत्या. दोन महिन्यांपासून सोनोग्राफी मशिन बंद होते. त्यामुळे गर्भवतींची गैरसोय होत होती. एक वर्षापासून नेत्र तपासणी विभाग बंद होता. रक्त, लघवीचे नमुने तपासणीसाठी अन्यत्र जावे लागते. याबाबत सकाळने १ डिसेंबरला सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून वस्तुस्थिती मांडली होती. त्यांनतर प्रशासनाला जाग आली आहे. येथे सोनोग्राफी विभागासाठी डॉ. दीपाली गळगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या दर बुधवारी पूर्ण दिवस उपलब्ध असतील. नेत्ररोग तपासणीसाठी डॉ. विजय देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते दर गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत असतील. दंतचिकित्सक म्हणून डॉ. दीप्ती वैद्य आणि डॉ. प्रियांका पवळे सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत काम करतील. लॅब टेक्‍निशियन म्हणून आकाश दाभाडे सोमवार ते शुक्रवार पूर्ण दिवस आणि शनिवारी अर्धा दिवस त्या सेवा देतील.

वडगाव शेरी, चंदननगर भागातील गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी येत होत्या. आता तर वाघोलीतूनही महिला येत आहेत. सातव्या, आठव्या व नवव्या महिन्यात सोनोग्राफी करून घेण्यासाठी येणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे.
- डॉ. दीपाली गळगे

वाढत्या महागाईने खासगी दवाखान्यातील खर्च परवडत नाही. अशा वेळी सरकारी रुग्णालय गोरगरीब व मध्यमवर्गीय लोकांसाठी एकमेव आधार आहे. यासाठी सरकारी वैद्यकीय सुविधा परिपूर्ण असणे आवश्‍यक आहे.
- मंदाकिनी चांदेरे, रहिवासी

Web Title: Thakare Hospital Amenity