esakal | घंटागाडी चालकाच्या तत्परतेमुळे वाचले अपघातग्रस्त दाम्पत्य, मुलाचे प्राण

बोलून बातमी शोधा

sagar pawar

घंटागाडी चालकाच्या तत्परतेमुळे वाचले अपघातग्रस्त दाम्पत्य, मुलाचे प्राण

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : येथील पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजुरी ( ता. जुन्नर) येथील दाम्पत्य व त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाला नारायणगाव ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीवरील चालकाने उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल केल्याने त्यांना जीवदान मिळाले. ही घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पुणे-नाशिक महामार्गावर घडली. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीवरील चालक सागर पवार यांनी केलेल्या मदतीमुळे राजुरी येथील किरण अंकुश कणसे (वय २८) , त्यांची पत्नी अनुराधा (वय २३), मुलगा शिवंश (वय दीड वर्ष) या अपघातातग्रस्त कुटुंबाला जीवदान मिळाले. दरम्यान, कणसे दाम्पत्य दीड वर्षाच्या मुलासह पुणे येथून राजूरी येथे दुचाकीवरून निघाले होते. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अनुराधा यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकला. या मुळे दुचाकी घसरून कणसे दाम्पत्य दीड वर्षांच्या मुलासह येथील महामार्गावर पडले. त्यांना गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.

हेही वाचा: जुन्नर तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडरची तीव्र टंचाई

दरम्यान, कचरा डेपोत कचरा खाली करून सागर पवार हे नारायणगावच्या दिशेने निघाले होते. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन पवार यांनी कणसे दाम्पत्य व त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाला घंटा गाडीत बसवले. पवार यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी येथिल भोसले हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. हनुमंत भोसले यांनी सुद्धा मानवतेच्या भावनेतून उपचारासाठी डिपॉझिट भरण्याचा आग्रह न करता तातडीने उपचार केले.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी तीन हजार २४८ रेमडेसिव्हीर; ऑक्सिजनच्याही मागणीत वाढ

दरम्यान, या बाबत डॉ. भोसले म्हणाले, ''कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मदत करण्यास कोणी पुढे येत नाही. मात्र पवार यांनी अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने वेळीच वैद्यकीय उपचार करणे शक्य झाले. या मुळे धोका टाळला असून रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.'' अपघातग्रस्तांना मदत करून जीवदान दिल्यामुळे पवार यांचा सत्कार विविध संस्थाच्या वतीने करण्यात आला.