Pune : सहा वर्षापासून ई-लर्निंग स्कूलचे काम चालूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा वर्षापासून ई-लर्निंग स्कूलचे काम चालूच

सहा वर्षापासून ई-लर्निंग स्कूलचे काम चालूच

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील सर्वे नंबर १८, १९ व २०(पार्ट) येथिल अॅमॅनिटी स्पेसच्या आरक्षित जागेवरील ई-लर्निंग स्कूलचे काम गेल्या सहा वर्षापासून चालूच असल्याचे चित्र आहे. २६ जानेवारी २०१६ला सहा वर्षापूर्वी इमारतीचे भूमिपूजन झाले. परंतु, पाच वर्षे उलटूनही इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. सध्या इमारतीचे काम चालू असले तरी ते कधी पूर्ण होणार याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.

ई-लर्निंग स्कूलसाठी मिळालेल्या डिझाईनच्या मान्यतेप्रमाणे इमारत ही पार्किंग, अप्पर पार्किंग आणि वर पाच मजले अशाप्रकारे होणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात पहिल्या फेजमध्ये बेसमेंट पार्किंग, अप्पर पार्किंग आणि वर तीन मजले एवढीच बांधण्यात येत आहे. एकूण डिझाईन प्रोजेक्टप्रमाणे आतापर्यंत केवळ ५० टक्केही काम पूर्ण झाल्याचे दिसत नाही. इमारतीचे तीन मजल्यांपर्यंत आरसीसी काम पूर्ण झाले असून त्या तीन मजल्यांचेही फ्लोरिंग, प्लास्टर, खिडक्या, रंगरंगोटी, वीज इत्यादी कामे बाकी आहेत. त्यामुळे इमारतीचे काम पूर्ण कधी होणार आणि ही इमारत महापालिकेकडून शिक्षण विभागाकडे कधी हस्तांतरित होणार हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.

सध्या निधी कमी असून अर्थिक तरतूद कमी पडत आहे. महापालिका एकाचवेळी सर्व ठिकाणी निधीची तरतूद करू शकत नसल्याने इमारतीचे काम संथगतीने चालू आहे. ज्यापद्धतीने निधी उपलब्ध होत आहे, त्यापद्धतीने प्राधान्यक्रम ठरवून काम चालू आहे. निधी उपलब्ध झाल्यास लवकरात लवकर काम पूर्ण करुन महापालिकेच्या शिक्षण विभाकडे इमारत हस्तांतरित करण्याचा प्रयत्न असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

रिकाम्या जागेत गॅस एजंसीच्या गाड्यांचे पार्किंग

इमारतीसमोरील रिकाम्या जागेत बाजूला असणाऱ्या रिकाम्या जागेत एचपी गॅस एजन्सीच्या गाड्या पार्किंगला असतात. तिथेच सिलेंडर उतरवले जातात. सिलेंडरची ने-आण करण्यासाठी या जागेचा वापर करण्यात येतो. तसेच पावसाळ्यात इमारतीच्या बेसमेंट पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळते.

गेल्या सहा वर्षापासून या इमारतीचे काम सुरु आहे. ई-लर्निंग स्कूलसाठी ही इमारत बांधली जात असल्याचा आनंद असला तरी ती प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार आहे हा प्रश्न उपस्थित होते. त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर इमारतीचे काम पूर्ण करावे ही अपेक्षा आहे. - प्रशांत जगताप, स्थानिक नागरिक

loading image
go to top