उद्‌घाटनाची घाई; पडदा खुला नाही

दिलीप कुऱ्हाडे 
सोमवार, 4 जून 2018

येरवडा - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह साकारल्यामुळे रसिक प्रेक्षकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. मात्र उद्‌घाटन होऊन दीड वर्ष झाले, तरीही नाट्यगृहाचा पडदा अद्यापही खालीच आहे. त्यामुळे येथील रसिक अद्यापही नाटकांची प्रतीक्षा करत आहेत.

येरवडा - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह साकारल्यामुळे रसिक प्रेक्षकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. मात्र उद्‌घाटन होऊन दीड वर्ष झाले, तरीही नाट्यगृहाचा पडदा अद्यापही खालीच आहे. त्यामुळे येथील रसिक अद्यापही नाटकांची प्रतीक्षा करत आहेत.

महापालिकेने १० कोटी रुपये खर्च करून येरवडा परिसरात भव्य नाट्यगृह बांधले. ग्रीक देशातील अथेन्स येथील स्थापत्यशास्त्राचा आधार घेऊन साडेतीन हजार चौरस मीटर जागेत हे नाट्यगृह उभारले. ७५० आसनक्षमतेच्या नाट्यगृहाचे काम अर्धवट असतानाच दीड वर्षापूर्वी महापालिकेच्या निवडणुका होण्यापूर्वी राजकीय नेत्यांनी त्याचे उद्‌घाटन केले. मात्र अद्यापही नाट्यगृहाचा पडदा खुला केला नसल्याने रसिक प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. 

नाट्यगृह सुरू होण्यापूर्वीच तेथील जिन्याच्या फरशा निघाल्या आहेत. काही ठिकाणी सीलिंग पडण्याची शक्‍यता आहे. एक कोटी रुपये खर्च करून बसविण्यात येणाऱ्या लिफ्टचे कामही अर्धवटच आहे. दोन लहान ड्रेसिंगरूमच्या नाट्यगृहात महत्त्वाच्या व्यक्तींसाठी प्रतीक्षागृहाचा अभाव आहे. वाहनतळातून पाणी वाहून जाण्यासाठी वाहिन्या बसविल्या नाहीत. 

नाटक म्हणजे आमचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, तर उपनगरांतील नाट्यगृहांतही आम्ही नाटकांचे प्रयोग करायला तयार आहोत. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने उपनगरांतील नाट्यगृहांत नाटकांचे प्रयोग होत नाहीत.
- मोहन कुलकर्णी, संचालक, मनोरंजन पुणे  

नाट्यगृह बांधून तयार झाले आहे. परंतु मनुष्यबळ नसल्याचे कारण देत महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने ते ताब्यात घेतले नाही. त्यामुळे वापराविना पडून असलेल्या वास्तूचे नुकसान होत आहे.
- इरफान शेख, कनिष्ठ अभियंता, भवन रचना विभाग 

अथेन्स कलेचा लुक
ग्रीक देशातील अथेन्समधील स्थापत्यशास्त्राचा आधार घेऊन नाट्यगृहाची बाह्यरचना केली आहे. विशिष्ट स्वरूपाचे ग्लास, अत्याधुनिक पद्धतीचे रंगमंच, ध्वनिवर्धक यंत्रणा येथे आहे. 

(उद्याच्या अंकात - हडपसर येथील तुपे सांस्कृतिक भवनाची सद्यःस्थिती)

Web Title: Theater cultural auditorium drama