प्रवासी लघुशंकेसाठी गेला अन् चोरट्याने डाव साधला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करुन आल्यानंतर रस्त्याच्याकडेला लघुशंकेसाठी गेलेल्या व्यक्तीकडील तब्बल 29 लाख 24 हजार रुपये असलेली सॅक चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना शनिवारी सकाळी साडे सहा वाजता येरवडा येथे घडली

पुणे : खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करुन आल्यानंतर रस्त्याच्याकडेला लघुशंकेसाठी गेलेल्या व्यक्तीकडील तब्बल 29 लाख 24 हजार रुपये असलेली सॅक चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना शनिवारी सकाळी साडे सहा वाजता येरवडा येथे घडली. 

याप्रकरणी विठ्ठल श्रीनिवासराव करजगीकर (वय 61, रा. शिवदत्तनगर, मालेगाव रोड, तरोडा खुर्द, नांदेड) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल करजगीगर हे नांदेड येथील रहिवासी आहेत. ते कुरीअर कंपनीमध्ये कामाला आहेत. ते काही कामानिमित्त पुण्यात येत होते. त्यावेळी तेथील एका व्यावसायिकाने पुण्यातील दुसऱ्या व्यावसायिकापर्यंत पोचविण्यासाठी त्यांच्याकडे 29 लाख 24 हजार 650 रुपये इतकी रक्कम असलेली एक सॅक दिली होती. त्यानुसार संबंधित सॅक घेऊन ते नांदेड येथून एका खासगी ट्रॅव्हल्समधून पुण्याला आले.

शनिवारी सकाळी साडे सहा वाजता त्यांची बस येरवडा येथील एका मशिदीजवळील मोकळ्या मैदानात थांबली. करजगीकर हे बसमधून उतरल्यानंतर लघुशंका करण्यासाठी रस्त्याच्याकडेला गेले. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडील सॅक बाजुला ठेवली होती. ते लघुशंकेला गेले असतानाच पाठीमागुन 22 वर्षीय चोरट्याने त्यांनी बाजुला ठेवलेली बॅग चोरुन नेली. सॅकमध्ये दोन हजार, पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांची 29 लाख 24 हजार 650 रुपये इतकी रक्कम ठेवण्यात आली होती. 

"फिर्यादीकडील चोरट्याने पळविलेली रक्कम ही पुण्यातील एका व्यावसायिकाची होती. त्यांना देण्यासाठी फिर्यादीने ही रक्कम आणली असताना चोरट्याने ती पळविली आहे. संबंधीत व्यावसायिकाने चोरीस गेलेली रक्कम आपली असल्याची कबुली दिली आहे.''
- मंगेश भांगे, पोलिस उपनिरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft of 29 lakhs while traveling to Pune in Private Traveler