चोरांनी खडकवासला परिसरातील बिअर शॉपी फोडली, पण एकाही बिअरला हात लावला नाही...

चोरांनी खडकवासला परिसरातील बिअर शॉपी फोडली, पण एकाही बिअरला हात लावला नाही...

किरकटवाडी : खडकवासला (ता. हवेली) येथील बाह्यवळण रस्त्याला लागून असलेली एक बिअर शॉपी चोरांनी फोडली मात्र केवळ आठशे ते हजार रुपये पर्यंत असलेली रोख रक्कम चोरांनी चोरून नेली. बिअर शॉपीत असलेल्या एकाही बिअरला चोरांनी हात लावला नाही. त्यामुळे या अनोख्या चोरीची एकच चर्चा खडकवासला परिसरात रंगल्याचे दिसून आले.

खडकवासला येथे एकाच रात्री चोरांनी साई कार डेकोर, रुबाबदार क्लॉथ सेंटर आणि स्वागत बिअर शॉपी अशी तीन दुकाने फोडली. साई कार डेकोर येथील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये 3 चोर चोरी करताना दिसत आहेत परंतु तोंड बांधलेले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. स्वागत बिअर शॉपीचे शटर तोडून चोरांनी आत प्रवेश केला. गल्यात असलेली किरकोळ आठशे ते हजार रुपये पर्यंतची रक्कम चोरांनी चोरली, मात्र दुकानातील एकाही बियरला हात लावला नाही.

रुबाबदार क्लॉथ सेंटरचे कुलूप तोडून शटर उचलण्याचा आवाज झाला तेव्हा दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत असलेले दुकान मालक धावत खाली आले. परिसरातील लोक जागे झाल्याने चोरांनी तेथून पळ काढला. एकाच रात्री तीन ठिकाणी असे चोरीचे प्रकार घडल्याने खडकवासला परिसरातील व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या चोरीच्या घटनांबाबत संबंधित व्यवसायिकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केले असून पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

नागरिक व व्यवसायिकांनी सतर्क रहावे- एकाच रात्रीत गावातील तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने नागरिक व व्यावसायिकांनी सतर्क राहावे असे आवाहन खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते यांनी केले आहे.गावात संशयित व्यक्ती फिरताना दिसल्यास किवा चोरीच्या घटना घडताना दिसल्यास तातडीने हवेली पोलिस किंवा आमच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन मते यांनी केले आहे.तसेच सर्व व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत असे आवाहन ग्रा.पं.सदस्य अनिकेत मते यांनी केले आहे.

किरकोळ चोरीच्या घटना घडल्या आहेत.तक्रार अर्ज देण्यात आले आहेत.व्यावसायिकांनी न घाबरता फिर्याद दाखल करण्यासाठी पुढे यायला हवे.रात्रगस्त वाढविण्यात आली आहे.काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.-सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलिस ठाणे

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com