
दौंड : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील हार्मोनी ऑरगॅनिक्स कंपनीमध्ये चाेरी
कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील हार्मोनी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून 47 लाख 27 हजार 250 रूपये किंमतीचे केमिकल चोरी गेले आहे. या घटनेनंतर औद्योगिक वसाहतीतील केमिकल चोरीचा प्रकार पुन्हा ऐरणीवर आला आहे. केमिकल चोरीत मोठी टोळी कार्यरत असून पाच कंपन्यांमधील आतापर्यंत 7 कोटी 30 लाख 51 हजार 250 रूपयांची केमिकल चोरी झाली आहे. या चोऱ्यांचा कसून तपास करून केमिकल चोरी करणाऱ्या टोळीचे कायमस्वरूपी कंबरडे मोडण्याची आवश्यकता आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील हार्मोनी ऑरगॅनिक्स कंपनीतील पॅलेडियम कॅटॅलिस्ट 26 किलो तर कॅटॅलिस्ट 101 नावाचे 17 किलो वेगवेगळया डब्यात ठेवलेले सीलबंद केमिकल 26 जूनला रात्री ते 27 जून 2022 च्या सकाळ दरम्यान अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे निदर्शनास आहे. यासंदर्भात कंपनीचे स्टोअर्स मॅनेजर दीपक मोतीराम चौधरी ( वय 56, रा. बारामती - भिगवण रोड इनामदारनगर पांडुरंग प्रेस्टीज फ्लॅट नं. 36, बारामती ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी औद्योगिक वसाहतीतील इटर्निस कंपनीतून 5 कोटी 47 लाख 20 हजार रूपयांचे केमिकल व मोडिप्रो कंपनीतून 75 लाखाचे केमिकल, मेल्झर कंपनीतून 48 लाख 50 हजाराचे तर एमक्युअर कंपनीतून 12 लाख 54 हजारांचे केमिकल चोरीला गेले आहे.
वसाहतीतून आतापर्यंत चोरीला गेलेल्या केमिकलची किंमत 7 कोटी 30 लाख 51 हजार 250 रूपये आहे. यासंदर्भात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. मात्र अटक चोरीतील छोटया माशांना होते आणि खरे सूत्रधार असलेले मोठे माशांना मोठया आर्थिक तडजोडीनंतर सोडून दिले जाते. केमिकल चोरीचा गुन्हा दाखल करणे, पोलिसांकडून गुन्हयाची आवश्यक कागदपत्रे घेऊन विमा कंपन्यांना नुकसान भरपाई मिळविली जाते. यामध्ये मोठयाप्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे.
Web Title: Theft Crime Of 48 Lakh Industrial Estate Harmony Organics Company In Kurkumbh Daund
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..