esakal | चोरीचे सव्वाशेहून अधिक गुन्हे; सराईत चोरट्यांना १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

चोरीचे सव्वाशेहून अधिक गुन्हे; सराईत चोरट्यांना १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - दरोडा टाकून फरारी होत असताना पोलिसांवर हल्ला (Police Attack) करणाऱ्या आणि चोरीचे (Theft) सव्वाशेहून अधिक गुन्हे (Crime) दाखल असलेल्या चोरट्यांना न्यायालयाने १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली. पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून दोघांना अटक केली होती. (Theft Crime Pune Police Custody)

बल्लूसिंग प्रभुसिंग टाक (वय ३०) आणि उजालासिंग प्रभुसिंग टाक (वय २७, दोघेही रा. रामटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात सोमनाथ नामदेव घारोळे, पिल्लूसिंग कालूसिंग जुन्नी, जलसिंग रजपूतसिंग दुधानी आणि गोरखसिंग गागासिंग टाक (सर्व रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. सोमवारी (ता. ५) रात्री दोनच्या सुमारास आरोपी हे कोथरूडमधील पंचरत्न सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये दरोडा टाकत होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे रात्रपाळीचे पोलिस अधिकारी व कर्मचारी काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: सुप्रिया सुळेंच्या ट्विटमुळं गावकऱ्यांना काही तासांत मिळाला दिलासा!

घरफोडी करून जिन्याने उतरत असताना पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यात प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत एकजण पोलिसांच्या तावडीत आला. तर दुसऱ्याने पळ काढला. त्यावेळी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केल्यानंतर पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले होते. त्यानंतर बुधवारी (ता. ७) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. बल्लूसिंग याच्यावर चोरीसह विविध प्रकारचे ६३ आणि उजालासिंग याच्यावर ७२ गुन्हे दाखल आहेत.

दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, २००८ पासून ते घरफोडीसारखे गुन्हे करीत असल्याचे सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयास सांगितले.

loading image