‘एकवीरा’चा कळस चोरणारे अटकेत

‘एकवीरा’चा कळस चोरणारे अटकेत

पुणे - कार्ला गडावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवी मंदिराच्या शिखरावरील कळस चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्‍या मंगळवारी ग्रामीण पोलिसांनी आवळल्या. सोन्याचा मुलामा दिलेला पंचधातूमधील अडीच किलोचा दीड वर्षापूर्वी चोरीला गेलेला कळस परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.

राहुल भागवत गावंडे, सोमनाथ अशोक गावंडे (वय २४, दोघेही रा. धामणगाव आवरी, अकोले, नगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्‌माकर घनवट यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

असा लागला शोध   
वेहरगाव, कार्ला गडावरील एकवीरा देवीच्या मंदिरावरील कळस तीन ऑक्‍टोबर २०१७ रोजी पहाटे चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. गडावर सीसीटीव्ही, पुजारी व सुरक्षा कर्मचारी असतानाही हा प्रकार घडला होता. कळस चोरी प्रकरणानंतर वेहेरगाव, कार्ला येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून निषेध नोंदविला होता. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले होते. त्या वेळी हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषणकडे (सीआयडी) सोपविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार त्याचा तपास ‘सीआयडी’कडे आला होता. दीड वर्षानंतरही सीआयडीच्या हाती काहीच लागले नाही. 

दरम्यान, एकवीरा देवी मंदिरावरील कळस चोरी प्रकरणातील आरोपी नगरमधील अकोला येथील असल्याची पक्की खबर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर घनवट यांच्या मार्गदर्शनाखालील जीवन राजगुरू, विजय पाटील, दत्तात्रय जगताप, प्रकाश वाघमारे, शरद बांबळे, सचिन गायकवाड, गणेश महाडिक, रौफ इनामदार, चंद्रशेखर मगर व अक्षय जावळे यांच्या पथकाने अकोला येथे जाऊन कसून शोध घेतला. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांना अटक केली. दोन्ही आरोपींनी पोलिसांकडे कळस चोरीची कबुली दिली. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या नावावर घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका आरोपीने वाणिज्य शाखेची पदवी घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपींना पुढील कारवाईसाठी सीआयडीकडे सोपविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

‘त्या’ गाण्यामुळे आरोपींची कळसाकडे नजर! 
राहुल व सोमनाथ हे दोघेही ऑक्‍टोबर २०१७ मध्ये एकवीरा देवीच्या यात्रेमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्या वेळी मंदिरामध्ये स्पीकरवर ‘आई तुझा सोन्याचा कळस’ हे गीत लावले होते. हेच गीत आरोपींच्या कानावर पडले आणि त्यांची नजर कळसाकडे वळली. कळसाला सोन्याचा मुलामा दिला असल्याने आरोपींना कळस खरोखरच सोन्याचा असल्याचे वाटले. तेव्हा मंदिरामध्ये काम सुरू असल्याने कळसापर्यंत शिडी, दोरखंड बांधलेला होता. आरोपींनी दोन ऑक्‍टोबरच्या मध्यरात्रीनंतर कळस काढला. त्यानंतर ते कळस घेऊन मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जंगलातून शिरोता तलावाजवळील घनदाट झाडीमध्ये गेले. तेथे हा कळस एका झाडावरती लपवून ठेवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com