पुण्यात चोरट्यांचा धुमाकुळ; घरे, सदनिका, कार्यालये फोडली

thief.jpg
thief.jpg

पुणे : संततधार पावसामुळे शहरामधील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, दुसरीकडे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. बंद घरे, एकाच सोसायटीतील अनेक सदनिका व टुर्स ट्रॅव्हल्स कंपनीची कार्यालये फोडून चोरट्यांनी तब्बल सव्वा आठ लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास केला. गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाच दिवशी जवळ-जवळ असलेल्या दोन सोसायट्यांमधील तब्बल नऊ ते दहा घरांमध्ये चोरट्यांनी चोरी केल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच मागील चार ते पाच दिवसामध्ये चोरट्यांनी पुन्हा एकदा शहरामध्ये धुमाकुळ घातल्याची सद्यस्थिती आहे. बिबवेवाडी येथील एकाच सोसायटीमधील सात सदनिका चोरट्यांनी सोमवारी पहाटे फोडल्या. याप्रकरणी 51 वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी या पुनम पार्क सोसायटीमध्ये राहतात. सोमवाटी पहाटे अडीच वाजता चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममधील साडे चार लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा सव्वा चार लाखांचा ऐवज चोरुन नेला. त्यानंतर पुरूषोत्तम साठे यांच्या सदनिकेतील दिड हजार रोख, दोन हजार रुपये किंमतीची चांदीची नाणी, विवेक कुलकर्णी यांच्या सदनिकेतील लॅपटॉप चोरुन नेला. याच सोसायटीतील रमेश मांगडे, दिलीप गायकवाड व अमर जोशी यांच्या सदनिकांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. 

उच्चभ्रु सोसायट्यांमध्येही चोरट्यांचा शिरकाव 
कोरेगाव पार्क येथील बोट क्‍लब रस्त्यावरील रिव्हर क्रिस्टा सोसायटीतील महेश रहेजा (वय 43, रा.नेपन्सी रोड, मुंबई) यांच्या सदनिकेचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून रविवारी पहाटे तीन वाजता चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. रहेजा यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्यावरील गणगोटे पथावरील ओमकृष्ण अपार्टमेंटमध्ये संग्राम जाधव (वय 26) यांची सदनिका आहे. सोमवारी पहाटे दोन वाजता चोरट्यांनी सदनिकेचा मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून चोरीचा प्रयत्न केला. 

खडकीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास 
खडकीतील रेंजहिल्स येथे राहणाऱ्या रामचंद्र पाटील (वय 35) यांच्या सदनिकेच्या गॅलरीमधील जाळी कापून 30 जुलै रोजी सकाळी साडे आठ ते सायंकाळी सहा या वेळेत सदनिकेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील कपाटात ठेवलेले दिड हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने असा सव्वा लाक रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. पाटील यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

केसरी टुसचे कार्यालय फोडले, तीन लाख लंपास 
फर्ग्युसन रस्त्यावरील लॅण्ड क्‍लेअर इमारतीमध्ये केसरी टुर्सचे कार्यालय आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील हॉटेलच्या स्वयंपाकघराच्या चिमणीचे बांधकाम करण्यासाठी बांधलेल्या बांबुवरुन चढून केसरी टुर्सच्या खिडकीजवळ पोचले. त्यानंतर त्यांनी खिडकीचे स्लायडींग उचकटून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयाच्या तिजोरी कटरने कापून त्यातील तीन लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी निलेश जव्हारकर (वय 48, रा.कर्वेरोड, कोथरुड) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com