बारामतीमध्ये महिलांसाठी चिंतेचे वातावरण, कारण...

मिलिंद संगई
Monday, 24 August 2020

शहरातील चोरीच्या घटनांनी नागरिक चिंतेत आहेत. रस्त्यावरुन जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकवणा-या चोरांची हिंमत आता वाढली आहे.

बारामती  : शहरातील चोरीच्या घटनांनी नागरिक चिंतेत आहेत. रस्त्यावरुन जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकवणा-या चोरांची हिंमत आता वाढली आहे. शहरातील गुनवडी रस्त्यावरील समर्थनगर भागातील सलोखा इमारतीत राहणा-या अरुणा बापूराव जाधव यांच्या गळ्यातील गंठण घरात घुसून चोरट्यांनी हिसकावून नेले. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. घरात माणस असताना घरात घुसून गळ्यातील गंठण चोरीला जाण्याची घटना गंभीर असून या मुळे चोरट्यांचे धाडस किती वाढले आहे, याचाच हा भाग असल्याची नागरिकात चर्चा आहे. 

या संदर्भात अरुणा यांचे चिरंजीव महेश बापूराव जाधव यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी (ता. 23) पहाटे बापूराव जाधव, अरुणा जाधव तसेच महेश जाधव व कुटुंबिय त्यांच्या घरात झोपले होते. पहाटे सव्वातीनच्या सुमारास अरुणा जाधव यांच्या ओरडण्याने महेश यांना जाग आली, तेव्हा अज्ञात चोरट्याने घरात घुसून आईच्या गळ्यातील गंठण हिसकावून नेले होते. ही घटना क्षणार्धात घडली. विशेष म्हणजे हे दोघेही दुस-या मजल्यावर झोपले होते. खालच्या बाजूने गच्चीत प्रवेश करुन घरात घुसून हे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. 
रस्त्यावरुन जाणा-या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चो-यांची संख्या तर लक्षणीय आहे. यातील किती चो-या उघड झाल्या, किती मुद्देमाल लोकांना परत मिळाला हा संशोधनाचाच विषय आहे. आता थेट दुस-या मजल्यावरील घरात घुसून अशा चो-या होण हा बारामतीकरांसाठी काळजीचा विषय ठरला आहे. 

गुन्हे शोध पथक स्थापन करण्याची मागणी
बारामतीतील उपविभागीय अधिकारी व अतिरिक्त पोलिस अधीक्षकांचे गुन्हे शोध पथक बरखास्त करुन अधिका-यांनी नेमके काय साध्य केले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसात लाखभर रुपये किंमतीच्या चार मोटारसायकली चोरीला गेल्या, या शिवाय इतरही अनेक मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत, गंठणचोरीसह इतरही चो-या होत आहेत, काही ठिकाणी चोरीचे प्रयत्नही होत आहेत, अशा स्थितीत गुन्हे शोध पथकांची बारामतीला गरज असताना ती मजबूत करण्याऐवजी बरखास्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft increased in Baramati